नशेच्या आहारी गेलेल्या गरीब तरुणांच्या पुनर्वसनासाठी महापालिकेतर्फे पुनर्वसन केंद्र उभारण्याची युवासेनेची मागणी
पनवेल - नशेच्या आहारी गेलेल्या गरीब तरुणांच्या पुनर्वसनासाठी महापालिकेतर्फे पुनर्वसन केंद्र उभारण्याची मागणी युवासेनेने पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे केली आहे.
आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात,पनवेल महानगरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अंमली पदार्थांच्या व्यसनामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत.शहरातील पोलिस प्रशासन सातत्याने कारवाई करत असले तरी व्यसनाधीन तरुणांना योग्य वैद्यकीय उपचार,मानसिक समुपदेशन आणि दीर्घकालीन पुनर्वसन सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांचे समाजात पुनर्वसन करणे अत्यंत कठीण ठरत आहे.
सध्या पनवेल परिसरात उपलब्ध असलेली पुनर्वसन केंद्रे पूर्णपणे खाजगी स्वरूपात चालवली जात असून त्यांचे शुल्क अत्यंत जास्त आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल, मध्यमवर्गीय तसेच सामाजिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या अनेक पालकांना त्यांच्या मुलांचे उपचार करणे परवडत नाही.अशा परिस्थितीत पालक मानसिक, आर्थिक आणि सामाजिक संकटात सापडतात.
व्यसनाधीन तरुणांना योग्य उपचार मिळाल्यास ते पुन्हा एकदा सन्मानाने समाजात प्रविष्ट होऊ शकतात. त्यांच्या कुटुंबांचे आयुष्य पुन्हा स्थिर आणि सुखकर होऊ शकते. त्यामुळे पनवेल महानगरपालिकेने पुढाकार घेऊन पनवेल शहरात शासनमान्य,प्रशिक्षित तज्ञ, डॉक्टर,मानसोपचार तज्ञ, समुपदेशक आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध असलेले सरकारी पुनर्वसन केंद्र सुरू करणे अत्यावश्यक असल्याचे तसेच लवकरात लवकर सदर पुनर्वसन सुरू करण्याच्या मागणीच पत्र आज युवासेना पनवेल महानगर समन्वयक श्री. जय कुष्टे यांनी जिल्हा अधिकारी श्री.पराग मोहिते यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महानगर पालिका आयुक्त श्री.मंगेश चितळे यांची भेट घेऊन दिले.
यासोबतच खालील बाबींचा विचार करण्यात यावा अशी मागणीही चर्चे दरम्यान श्री.जय कुष्टे यांनी केली.
१. व्यसनमुक्ती केंद्रासाठी स्वतंत्र इमारत उपलब्ध करून देण्यात यावी.
२. प्रशिक्षित मानसोपचार तज्ञ, समुपदेशक आणि वैद्यकीय कर्मचारी नेमण्यात यावेत.
३. पोलिस विभाग, आरोग्य विभाग आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त समन्वयात जागरूकता मोहीम राबवण्यात यावी.
४. समाजातील व्यसनाधीन तरुणांसाठी मोफत किंवा अत्यल्प शुल्कात उपचार मिळण्यासाठी विशेष योजना तयार करण्यात यावी.
५. शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी व्यसनमुक्ती व जनजागृती कार्यक्रम नियमितरित्या राबवण्यात यावेत.
यावेळी त्यांच्यासोबत विधानसभा अधिकारी श्री.अजय पाटील तसेच शिवसैनिक श्री.सुशांत सावंत उपस्थित होते.
Post a Comment