एस.पी.मोरे कॉलेज ऑफ पॅरामेडिकल अँड नर्सिंग एज्युकेशन विद्यार्थ्यांची सामाजिक बांधिलकी –ऑटिस्टिक विद्यार्थ्यांसाठी संवेदनशील उपक्रम
पनवेल - एस.पी.मोरे कॉलेज ऑफ पॅरामेडिकल अँड नर्सिंग एज्युकेशन हे महाविद्यालय केवळ शैक्षणिक उत्कृष्टतेवर भर देत नाही,तर आपल्या विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक संवेदनशीलता आणि जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे.या परंपरेचा एक भाग म्हणून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी नवीन पनवेल येथील डॉ.नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचलित बौद्धिक अक्षम व ऑटिस्टिक मुलांच्या शाळेला भेट दिली.
या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी मुलांची आरोग्य तपासणी केली, त्यांच्याशी संवाद साधला आणि जे आपले विचार किंवा समस्या सहज व्यक्त करू शकत नाहीत अशा मुलांना समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. मुलांच्या शिकण्याच्या पद्धती, त्यांच्या कौशल्यविकासासाठी घेतले जाणारे उपक्रम, आणि त्यातून त्यांना आत्मनिर्भरतेकडे कसे नेले जाते याची सखोल माहिती विद्यार्थ्यांनी घेतली.
एस.पी.मोरे कॉलेजचे विद्यार्थी या अनुभवातून फक्त व्यावसायिक कौशल्यच नाही तर सहानुभूती, धीर, करुणा आणि सामाजिक जबाबदारी या जीवनमूल्यांचे धडे शिकले. भविष्यातही अशा मुलांसाठी मोफत वैद्यकीय मदत देण्याची तयारी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली,ज्यातून महाविद्यालयाचा सामाजिक बांधिलकीचा दृष्टिकोन अधिक अधोरेखित झाला.
या उपक्रमाची संकल्पना व रूपरेखा डॉ.मुस्कान शर्मा यांनी आखली होती.शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.श्रेया नंदकुमार जाधव आणि संपूर्ण शिक्षकवृंद यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
एस.पी.मोरे कॉलेजच्या या संवेदनशील पावलाने हे सिद्ध केले की शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकातील ज्ञान नव्हे, तर समाजातील प्रत्येक घटकाबद्दल जाणीव,सहानुभूती आणि हातभार लावण्याची तयारी असणे होय.
Post a Comment