पनवेल महापालिकेच्या माध्यमातून होणार 'INS पनवेल' या युद्धनौकेच्या शौर्याचे स्मारक! शिवसेनेचे प्रथमेश सोमण यांचा पुढाकार
पनवेल - 1971 च्या भारत पाकिस्तान युद्धात अतुलनीय शौर्य गाजवणाऱ्या INS पनवेल या युद्धनौकेचे पनवेलमध्ये स्मारक उभारले जाणार आहे,याबाबत एक महत्त्वपूर्ण बैठक होऊन शिवसेनेचे महानगरप्रमुख माजी नगरसेवक प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांनी या विषयात पुढाकार घेऊन महापालिकेकडे तशी आग्रही मागणी शिवसेनेच्या माध्यमातून केली आहे.
देशातील ऐतिहासिक शहरे,शिवाजी महाराजांच्या काळातील बंदरे असणाऱ्या शहरांचे नाव युद्धनौकेला देण्याच्या प्रथेतून भारतीय नौदलाने एका युद्धनौकेला आयएनएस पनवेल असे नाव दिले.या युद्धनौकेने 1971 च्या युद्धात तत्कालीन ईस्ट पाकिस्तान म्हणजेच बांगलादेशात जाऊन प्रचंड शौर्य गाजवले व या युद्धनौकेवरील युद्धांना तीन महावीर चक्र, सात वीर चक्र, पाच नौसेना मेडल्स मिळाली आहेत. देशातील युद्धांच्या इतिहासात एवढे पराक्रमी शौर्य गाजवणारी युद्धनौका आयएनएस पनवेल ही या शहराच्या नावावरून ओळखण्यात येत होती परंतु पनवेलकरांना ही गोष्ट माहीत नव्हती. जेष्ठराज गणपती देवस्थानच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात आलेल्या एका बड्या नौदल अधिकाऱ्याने ही गोष्ट सांगितली. या देवस्थानचे विश्वस्त असलेले पनवेलचे शिवसेना महानगरप्रमुख प्रथमेश सोमण यांनी याबाबत काहीतरी करावे यासाठी थोडा आणखी अभ्यास करून या विषयाबाबत आवश्यक ती माहिती देण्याकरता एका बैठकीचे आयोजन केले. थेट नवी दिल्लीहून रिटायर्ड कर्नल अनुराग अवस्थी, डिफेन्स एक्स्पर्ट संदीप उन्निथन आणि पनवेल मधीलच स्थायिक असलेले नौदलाचे माजी कप्तान अमृत गोडबोले यांच्यासह प्रथमेश सोमण यांनी पनवेल महापालिकेत जाऊन आयुक्त श्री मंगेश चितळे यांची भेट घेतली.त्यांना आयएनएस पनवेलच्या शौर्यबद्दल माहिती दिल्यावर ही पनवेलकरांसाठी अतिशय गौरवाची बाब असून जास्तीत जास्त लोकांना याची माहिती व्हावी व या शौर्याचे यथोचित स्मारक पनवेल मध्ये उभे करावे याबाबत एक मत झाले. यावेळी उपस्थित सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.या संदर्भात आवश्यक ती कार्यवाही लवकरात लवकर सुरू करून चांगल्या जागेवर आयएनएस पनवेलच्या प्रतिकृतीसह शौर्याच्या आठवणींना उजाळा देणारे स्मारक उभे करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
Post a Comment