डेटिंग अॅपद्वारे महिलेशी ओळख ज्येष्ठ नागरिकाला भोवली.... अज्ञात महिलेविरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार....तब्बल ७४ लाख ७२ हजार रुपये उकळल्याचे उघडकीस
पनवेल (वार्ताहर) ः डेटिंग अॅपद्वारे अनोळखी महिलेसोबत मैत्री करणे नवीन पनवेल भागात राहणार्या एका 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला चांगलेच भोवले. या ज्येष्ठ नागरिकाशी डेटिंग अॅपद्वारे मैत्री केल्यानंतर संबंधित महिलेने त्यांच्याशी प्रेमाचे नाटक करत त्यांना गोल्ड ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवण्यास सांगत तब्बल 73 लाख 72 हजार रुपये उकळल्याचे उघडकीस आले आहे.खांदेश्वर पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.
या ज्येष्ठ नागरिकाने मार्च 2024 मध्ये त्यांच्या मोबाईलमध्ये बम्बल नावाच्या डेटिंग अॅपवर सर्चिग सुरू केले होते. त्यातून झिया नावाच्या महिलेशी त्यांची ओळख झाली. त्यानंतर झियाने त्यांच्यासोबत व्हॉट्सअॅप चॅटिंगद्वारे तसेच व्हॉट्सअॅपवर कॉल करून मैत्री केली. तसेच त्यांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून विश्वास संपादन केला. त्यानंतर तिने गोल्ड ट्रेडिंगची माहिती देत त्यात गुंतवणूक केल्यास भरपूर नफा होईल, असे सांगितले. त्यावर त्यांनी सुरुवातीला 25 हजार रुपयांची गुंतवणूक केली. त्याबदल्यात त्यांना 3560 रुपयांचा नफा झाला. हे पाहून ते गोल्ड ट्रेडिंगमध्ये मोठी रक्कम गुंतवू लागले. त्यानंतर झियाने ट्रेडिंग प्लॅटफॉर्ममध्ये पैसे गुंतवणुकीतून जो फायदा होईल त्यामधून तिच्यासोबत भागीदारीत सौंदर्यप्रसाधन निर्मिती कंपनी स्थापन करण्याची इच्छा व्यक्ती केली. त्यानुसार त्यांनी या ट्रेडिंग फ्लॅटफॉर्ममध्ये 58 लाख रुपये गुंतवले असता त्यांना 2 कोटींचा नफा झाल्याचे भासवण्यात आले.
मात्र, ही रक्कम काढण्यासाठी त्यांना 44 लाख 40 हजार रुपयांचा कर भरावा लागेल, असे सांगण्यात आले. मात्र एवढी मोठी रक्कम भरणे शक्य होणार नाही, असे त्यांनी सांगितले असता झियाने त्यांना 1 कोटीसाठी 22 लाख रुपये कर भरावे लागतील, असे सांगत 8 लाख रुपयांचा कर त्यांच्या नावाने भरल्याचे या अॅपवर दाखवले. त्यावर त्यांनी 14 लाख 20 रुपये भरले. मात्र, त्यांनी यांच्या नफ्यातील 1 कोटीची मागणी केली असता, ट्रेडिंग फ्लॅटफॉर्मची साईट बदलल्याचे तसेच त्यांचे नियम बदलल्याचे सांगत 2 कोटीच्या नफ्यासाठी त्यांना उर्वरित 22 लाख 20 हजार रुपये भरावे लागतील, असे झियाने त्यांना सांगितले. दरम्यान, या प्रकरणात आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
Post a Comment