गाढी नदीवरील चिपळे येथील पुलाचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते लोकार्पण ...लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आ. प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती
पनवेल (प्रतिनिधी) लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासारखे कणखर नेतृत्व लाभल्यामुळे या तालुका आणि जिल्ह्याचा विकास रोखणे अशक्य आहे, असे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी काढले,ते चिपळे येथील नव्या पुलाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या चिपळे येथील पुलाचे लोकार्पण राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत (दि. १९ जुलै) झाले. या पुलामुळे आजूबाजूच्या गावांची कनेक्टिव्हीटी सुरळीत झाली आहे. पनवेल तालुका आणि जिल्हा हे आज झपाट्याने प्रगतिपथावर वाटचाल करत आहेत. या प्रगतीमागे लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांचे खंबीर नेतृत्व, दूरदृष्टी आणि जनविकासाभिमुख दृष्टीकोन असल्याचे नामदार शिवेंद्रराजे भोसले यांनी यावेळी बोलताना अधोरेखित केले.
या सोहळ्याला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, भाजपचे महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, प्रल्हाद केणी, टीआयपीएलचे संचालक अमोघ ठाकूर, भाजपचे पनवेल तालुका पूर्व मंडल अध्यक्ष भूपेंद्र पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, एकनाथ देशेकर, माजी सरपंच रमेश पाटील, शिवाजी दुर्गे, वासुदेव गवते, विभागीय अध्यक्ष सुनिल पाटील, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, डॉ. रोशन पाटील, विश्वजित पाटील, मयूर कदम, गौरव कांडपिळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.
सन १९७५ साली बांधण्यात आलेल्या नेरे मालडुंगे रस्त्यावरील चिपळे पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असते. या पुलाचे आयुर्मान जवळपास ५० वर्षे होते. मात्र २००५ मध्ये आलेल्या पुराचा मोठा तडाखा या पुलाला बसला आणि पुलाचे नुकसान झाले होते.पूल खचण्याची भीती निर्माण झाली होती,त्यामुळे या पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांडून होत होती.भविष्यात मोठा अनुचित प्रकार घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती,पूल धोकादायक झाल्याने तात्पुरती डागडुजी उपयोगाची नसल्याने यावर योग्य पर्याय म्हणून त्या ठिकाणी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्यातून नवीन पुल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यानुसार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नाने अर्थसंकल्पीय निधीतून १० कोटी रुपये खर्च करून या पुलाची उभारणी झाली.या पुलाच्या माध्यमातून नेरे,चिपळे,वाजे,गाढेश्वर,धोदाणी,मालडुंगे या परिसरात जाण्यासाठी उपयोग केला जातो. हा पूल जवळपास ६६ मिटर लांब, १२ मीटर रुंद आहे. वाहतुकीच्या दृष्टिकोनातून या पुलाच्या सुविधेमुळे प्रवाशी, वाहनचालक आणि ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला असून या विकासकामासाठी सतत प्रयत्न केल्याबद्दल नागरिकांकडून आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार मानले जात आहे.
Post a Comment