पनवेल रेल्वे स्थानकावरील मंगला एक्स्प्रेसमधून ३५ कोटीचे ड्रग्स अमली पदार्थ नियंत्रण विभागाने केले जप्त
पनवेल दि.१८(वार्ताहर): पनवेल रेल्वे स्थानकावर नार्कोटीक्स कंट्रोल ब्यूरो म्हणजेच अमली पदार्थ नियंत्रण विभागाने मोठी कारवाई करत सुमारे ३.५ किलोचे ड्रग्स जप्त केले आहे.मंगला एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या दोन प्रवाशांकडून हे ड्रग्ज आज सकाळी जप्त करण्यात आले आहे.खाण्याच्या पुड्यामध्ये हे ड्रग्ज ठेवण्यात आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, ही कारवाई गोपनीय माहितीनुसार करण्यात आली.जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत जवळपास ३५ कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचे सांगितले जात आहे.
ही कारवाई केल्यानंतर ड्रग्ज रेल्वे सुरक्षा दलाच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.ताब्यात घेतलेल्या प्रवाशांचा कोणत्या टोळीशी याचा संबंध आहे, तसेच कोणाला अटक झाली आहे का याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही.मात्र अमली पदार्थ नियंत्रण विभाग आणि रेल्वे पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. पनवेल रेल्वे स्थानकावर अशा प्रकारचे मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त होणे ही गंभीर बाब मानली जात आहे.शहरातील ड्रग्ज नेटवर्कचा मागोवा घेण्यासाठी तपास यंत्रणा सज्ज झाली असून, या कारवाईमुळे ड्रग्ज रॅकेट उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Post a Comment