कामोठ्यातील सकल हिंदू उत्सव समितीतर्फे "एक शहर, एक शिवजयंती" सोहळा ...अनेक उपक्रमांनी संस्कृती व ऐतिहासिक परंपरा जपण्याचा प्रयत्न
पनवेल - कामोठ्यातील सकल हिंदू उत्सव समितीतर्फे "एक शहर, एक शिवजयंती" सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अनेक उपक्रमांनी संस्कृती व ऐतिहासिक परंपरा जपण्याचा प्रयत्न समितीतर्फे करण्यात आला.
तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या सकल हिंदू उत्सव समितीच्यावतीने "एक शहर,एक शिवजयंती" सोहळ्याचे आयोजन कामोठे येथे करण्यात आले.यावर्षीचे हे चौथे वर्ष मोठ्या उत्साहात आणि थाटात पार पडले.दि.१७ मार्च २०२५ (फाल्गुन वैद्य तृतीया) रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक,कामोठे पोलीस स्टेशन समोर भरवलेल्या या सोहळ्याने शिवप्रेमींच्या हृदयात अभिमानाची ज्योत प्रज्वलित केली.
या सोहळ्यात शाहीर यशवंत जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या शाहिरी कार्यक्रमाने शिवचरित्राची प्रेरणादायी अमुल्य शिकवण प्रेक्षकांच्या मनामध्ये कायमस्वरूपी कोरली.
या सोहळ्यात भजनी मंडळ,लाठीकाठी,तलवारबाजी पथक, शस्त्रपथक,हिरकणी लेझीम पथक व बोथाडी पथक यांच्या प्रात्यक्षिकाने कार्यक्रमाला वेगळा नूर प्राप्त झाला.
संस्कृती आणि परंपरेचा अभिमान जपत समितीने नेहमीच काहीतरी आगळेवेगळे करण्याचा प्रयत्न केला आहे.त्यामुळे कामोठे शहरात शिवमय वातावरण झाले होते या सोहळ्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.या सोहळ्याच्या भव्य यशामागे कामोठे शहरातील शिवप्रेमींचे अथक सहकार्य असून, पोलीस प्रशासन,महानगरपालिका तसेच या भव्य दिव्य सोहळ्यास विविधस्तरातून मदतीचा हात पोहोचवणाऱ्या सर्वांचे आभार समितीने व्यक्त केले. आगामी वर्षी शिवजयंती अधिक भव्य स्वरूपात साजरी करण्याचा निर्धार समितीने केला आहे.
Post a Comment