पनवेल महानगरपालिकेचा आजवरील सर्वाधिक वसुलीचा विक्रम .... महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने एका वर्षात केली ३७० कोटीची वसुली
पनवेल :- पनवेल महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाने २०२४-२५ या आर्थिक वर्षात ३७० कोटींची वसुली केली असून हा आजवरील सर्वांधिक वसुलीचा विक्रम आहे.आयुक्त तथा प्रशासक श्री. मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता कर विभागाने नियोजनबध्द पध्दतीने रूपरेषा आखून वसूलीचा हा विक्रम केला आहे. मालमत्ताकर विभागाचे उपायुक्त स्वरूप खारगे यांच्या नियंत्रणाखाली योग्य उपाय योजना राबवत उच्चांकी महसूल महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे.
मालमत्ता कर विभागाचे कर अधिक्षक महेश गायकवाड व सुनील भोईर यांच्या नेतृत्वाखाली मुख्यालय व चारही प्रभागामधील कर्मचारी मार्च महिना संपेपर्यंत कोणतीही सुट्टी न घेता शनिवार ,रविवारी देखील कार्यालये सुरू ठेवून काम करत आहेत.पालिकेचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी थकबाकीदारांवरती अटकावणी कारवाई सुरु आहे.या वसुलीसाठी महापालिकेच्यावतीने यावेळी १३ पथके कार्यरत आहेत.प्रभाग अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली ही पथके सर्व प्रभागांमध्ये वसुलीसाठी जात आहेत.
पनवेल महापालिकेचे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून महानगरपालिकेने सिडको हस्तांतरीत भाग,मार्बल मार्केट,जवाहर औद्योगिक वसाहत ,तळोजा औद्योगिक वसाहत,पनवेल औद्योगिक वसाहतअशा विविध भागांमध्ये व्यवसायिक मालमत्ता करधारकांडून वसुलीची थेट कारवाई सुरु केली आहे.ज्या थकबाकीदारांना जप्ती नोटीसा दिल्या आहेत त्यांना आता वॉरंट नोटीसा देण्याचे काम पालिकेने सुरू केले आहे.तसेच अटकावणीच्या मोहिमेलाही सुरूवात करण्यात आली आहे.याचा थकबाकीदार यांनी गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे.
मार्च महिन्यात दररोज एक कोटीचा कर महापालिकेच्या तिजोरीत जमा होत असून त्यामध्ये आज १९ मार्च रोजी महापालिकेने मागील वर्षाचा विक्रम मोडित काढत विक्रमी वसुली केली आहे.मागील वर्षी ३१ मार्च अखेर एकुण ३६० कोटीचा भरणा झाला होता.हा विक्रम यावर्षी १० दिवस आधीच मोडित काढला आहे.
दरम्यान मालमत्ता कर हा महापालिकेचा मुख्य आर्थिक स्त्रोत असल्याने नागरिकांनी मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पालिकेच्यावतीने करण्यात आली आले आहे.
Post a Comment