दिशा व्यासपीठातर्फे 'ती' च्या अस्तित्वासाठी हळदीकुंकू आणि ढोलकीच्या तालावर उपक्रमाचे आयोजन
पनवेल - ढोलकीच्या तालावर आणि हळदीकुंकूचा थाट खास 'ती' च्या अस्तित्वासाठी या उपक्रमाचे आयोजन कामोठे येथील कराडी हॉल या ठिकाणी करण्यात आले होते.कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे नेहमीप्रमाणेच हळदी कुंकूची सुरुवात विधवा महिला व एलजीबीटी यांना हळदी कुंकवाचा मान देऊन करण्यात आली.पूर्वापार चालत आलेल्या त्या रुढीला बाजूला सारून सर्वसामान्य स्त्री प्रमाणे तिलाही समाजात तोच मानसन्मान मिळावा हीच भावना ठेऊन दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी हळदी कुंकूचे आयोजन दिशा व्यासपीठामार्फत करण्यात आले होते.शिवशाही सेना ( कामगार संघटना) संस्थापक श्री.राजकुमार पाटील व राजश्री पाटील यांच्या सहकार्याने तसेच साई द्वारका क्लिनिक व नर्सिंग होमचे डॉ.हेमंत पाटील,यशोदा हॉस्पिटलचे डॉ. स्नेहलता- डॉ बाळासाहेब खडबडे यांचे सहकार्य दिशा व्यासपीठास मिळाले तसेच शुभांगी कलेक्शनच्या शुभांगी पाटील,स्वीट एंजेल प्रि स्कूलच्या मंदाकिनी पाटील यांच्याकडून महिलांना वाण देण्यात आले तसेच हरेश्वर ज्वेलर्सकडून लकी ड्रॉसाठी सोन्याची नथ व 1 ग्रॅम गोल्ड नेकलेस देण्यात आला. पैठणीसाठी मनीषा घोटणे यांचे सहकार्य मिळाले.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती विमल बिडवे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कामोठे पोलिस स्टेशन) श्रीमती प्रियंका खरटमोल मॅडम(सहाय्यक पोलिस निरीक्षक) सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या इंदू झा मोहिनी पाटील (आमदार विक्रांत पाटील यांच्या सुविद्य पत्नी),स्नेहल पाटील (आमदार विक्रांत पाटील यांच्या भगिनी) उपस्थित होत्या.
पतीच्या निधनानंतर महिलेला कुंकू लावण्यास बंदी घालणं कितपत योग्य आहे. दुखा:चा डोंगर डोक्यावर कोसळलेल्या असतानाही उद्योगधंदे, घरं चालवणे,मुलांचं शिक्षण या सर्व जबाबदाऱ्या महिला आपलं कर्तव्य समजून पार पाडतात.तरीही अशा महिलांना समाजात अशा समारंभात बाजूला सारलं जात म्हणूनच हा पायंडा आम्ही 2020 पासून मोडीत काढत आलेलो आहोत हा हळदी कुंकवाचा हा थाट खास त्यांच्यासाठीच असतो असे यावेळी दिशा संस्थापिका निलम आंधळे म्हणाल्या.महिला सबलीकरण व सक्षमीकरणासाठीच्या कार्यात नेहमी दिशा सोबत आहे असे आश्वासन राजकुमार पाटील यांनी दिले.
कुंकवाचा धनी परलोकवासी झाल्यानंतर घरीदारी उपेक्षेची नजर वाट्याला आलेल्या महिलांच्या कपाळी हळदी-कुंकवाची बोटं लागली आणि त्यांच्या डोळ्यात पाणी तरळले एकमेकींना आलिंगन देऊन निःशब्द भावना नजरेतून यावेळी व्यक्त झाल्या यावेळी LGBT विकास व ज्ञानेश्वर यांचीही उपस्थिती कार्यक्रमात लाभली आपल्यातीलच एक असलेल्या या व्यक्तिमत्वास सर्वांनी स्वीकारावं त्यांच्याबद्दल असलेले गैरसमज दूर व्हावेत त्यांनाही तेवढाच मान सन्मान मिळावा या उद्देशाने ते ही या समारंभात व्यक्त झाले,या समारंभाचे भावनिक दृश्य यावेळी पाहायला मिळाला.यावेळी महिलांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली.ढोलकीच्या तालावर महिलांनी काही परफॉर्मन्स देखील केले व इतर महिलांनाही थिरकायला भाग पाडले.नृत्यांगना मिताली पाटील खास या सदाबहार लावणीसाठी उपस्थित होत्या.सायबर क्राईम व इतर विषयावरील जनजागृतीच्या कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते लाभलेल्या काही मान्यवरांचा सन्मानही यावेळी करण्यात आला.आरती चव्हाण यांनी धमाल,मजेशीर,विविध खेळ खेळत बक्षीसांची लयलूट करत मोठ्या जल्लोषात समारंभ पार पडला.यावेळी दिशा व्यासपीठाच्या उपाध्यक्ष विद्या मोहिते यांनी कार्यक्रमाची धुरा सांभाळत सर्व महिलांच्या पाठीशी कणखरपणे उभे आहोत असे म्हणाल्या व आतापर्यंत च्या व्यासपीठातील काही आठवणी ताज्या करत त्या गहिवरून गेल्या.या हळदीकुंकू समारंभास कामोठे व परिसरातील महिला मान्यवरांची देखील उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी उपक्रमाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.संस्कृती जपणारा,महिलांच्या सन्मानासाठी प्रेरणादायी ठरलेला हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
Post a Comment