सुधागडचे भाग्यविधाते वसंत ओसवाल यांचे निधन ....पालीत होणार अंत्यसंस्कार,सुधागडवर शोककळा
कळंबोली (दीपक घोसाळकर): - सुधागड एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष वसंत गणेशमल ओसवाल यांचे वयाच्या ८२ व्यां वर्षी पुणे येथे उपचार सुरू असताना बुधवारी दुःखद निधन झाले.त्यांच्या पश्चात मुलगा,दोन मुली, सुन,नातवंडे,जावई,भाऊ असा परिवार आहे. समाज, सांस्कृतिक, राजकीय,शैक्षणिक, क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावून आपला कार्याचा ठसा त्यांनी गेली पाच दशके समाजमनावर बिंबवला आहे. त्यांच्या आकस्मित दुःखद निधनाने सुधागड एज्युकेशन सोसायटीचा संपूर्ण परिवारावर तसेच सुधागड तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील हजारो हितचिंतकांवर शोककळा पसरली आहे .त्यांचे मृतदेहावर उद्या पाली येथील स्मशानभूमीत सकाळी साडे अकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
२५ डिसेंबर १९४२ मध्ये पाली येथे जन्मलेल्या आदरणीय वसंत ओसवाल यांनी वाणिज्य शाखेतून पदवी पर्यंत मुंबई येथे शिक्षण पूर्ण केले.त्यानंतर राजकीय,सामाजिक ,सांस्कृतिक व सार्वजनिक क्षेत्रात त्यांनी आपले पदार्पण सुरू केले.रायगड जिल्हा भात गिरणी असोसिएशनच्या अध्यक्षपदापासून ते सुधागड पंचायत समिती सदस्य,जिल्हा परिषद सदस्य तसेच राज्याचे कॅबिनेट दर्जाचे असलेले ईतर मागासवर्गीय महामंडळाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. जिल्हा परिषदेचे सदस्य असताना त्यांनी सुधागड तालुक्यात विकासाची गंगा आणली.तालुक्यातील दर्या खोऱ्यात डांबरी रस्त्याचे जाळे त्यांनी विणले. राष्ट्रवादी काँग्रेसचे केंद्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची राजकारणात गणना केली जात आहे. त्यांच्या पंचात्तराव्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अभिष्टचिंतन सोहळ्याला दस्तुरखुद शरदचंद्रजी पवार यांनी पालीत येऊन त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या होत्या.राजकारणात जात,पात ,धर्मभेद यांच्या भिंती ओलांडून त्यांनी राजकारणात आपला एक आगळावेगळा ठसा जनमाणसांवर उमटवला आहे. सुधागड तालुक्याचा विकास व्हावा हा त्यांचा एक ध्यास असायचा. शिक्षण महर्षी दादासाहेब लिमये यांच्या निधनानंतर सुधागड एज्युकेशन सोसायटी संस्थेच्या कार्यभार त्यांनी आपल्या हाती घेतला. सुधागड एज्युकेशन सोसायटीला सुवर्ण झळाळी त्यांनी एक चांगल्या प्रकारे मिळवून दिली आहे .संस्थेचा आर्थिक, भौगोलिक व शैक्षणिक विकास त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये चांगल्या पद्धतीत करून शैक्षणिक संस्था रायगड सह नव्या मुंबईत नावारूपाला आणली. शाळांचा भौगोलिक , विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास, कर्मचाऱ्यांमध्ये विद्यार्थ्याप्रती नव जागृती निर्माण करून आधुनिक पद्धतीने शिक्षणाचे धडे कसे द्यायचे याबाबत त्यांचे नेहमी विचार मंथन असायचे .त्या पद्धतीची प्रेरणा संस्थेच्या सर्व शाळांमधून ते स्वतः भेटी देऊन प्राचार्य व मुख्याध्यापक व सर्व कर्मचाऱ्यांना देत असत. शैक्षणिक संस्थेत विद्यार्थी प्रति आधुनिक पद्धतीचे शिक्षण घेऊन कला, क्रीडा व अन्य क्षेत्रात विद्यार्थ्यांनी यश मिळवून संस्थेचे नाव उज्वल करावे यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असायचे. सुधागड सह रायगडच्या राजकारणात त्यांचा एक वेगळा दबदबा व प्रतिष्ठा त्यांनी जोपासली होती. पक्ष विरहित त्यांनी समाजकारण व राजकारण करून एक आगळावेगळा सन्मान राजकीय क्षेत्रात त्यांनी मिळवला होता. त्यांनी केलेल्या राजकीय प्रवासाच्या यशा मधूनच त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची राज्याच्या इतर मागासवर्गीय महामंडळावर शासनाने अध्यक्षपदी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. महामंडळाचे अध्यक्ष पद भूषवित असताना इतर मागासवर्गीय समाजातील तरुणांना उद्योग, व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या विविध योजना त्यांनी महामंडळातर्फे कार्यान्वित करून राबविल्या.राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्मितीपासून ते कायम शरदचंद्रजी पवार यांच्या समवेतच राहिले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्मितीपासून सलग तीन वेळा ते जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी पक्षाचे काम पाहिले.पक्ष तळागाळात कसा पोहोचेल यासाठी त्यांनी मोठ्या जिद्दीने आणि धडाडीने पक्ष संघटनेच्या मजबुती करण्यासाठी काम केले. मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य म्हणूनही त्यांनी काही काळ काम पाहून विद्यापीठाच्या कामकाजावरही लक्ष केंद्रित केले. रायगड जिल्हा नियोजन मंडळाचे एक अभ्यासू व तज्ञ सभासद म्हणूनही त्यांनी आपली मोलाची कामगिरी बजावलेली आहे.त्यांनी केलेल्या सामाजिक ,सांस्कृतिक राजकीय व शैक्षणिक कामगिरी बद्दल विविध संस्था कडून त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.त्यांच्या आकस्मित दुःखद निधनाने रायगडच्या राजकारणात एक आगळी वेगळी पोकळी निर्माण झाली असून रायगडसह राज्यातील अनेक विविध पक्षाच्या राजकीय नेत्यांनी त्यांच्या दुःखद निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली आहे. त्यांचे पार्थिव दर्शनासाठी पाली येथे उद्या सकाळी आणण्यात येणार आहे. सकाळी साडेअकरा वाजता पालीतील स्मशानभूमीत पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
Post a Comment