मराठमोळ्या दै.पुण्यनगरीची रौप्यमहोत्सवी घोडदौड ..... वर्धापनदिनपूर्तीच्या निमित्ताने मराठी भाषा,संस्कृती आणि अस्मितेचा वेध घेणारा विशेषांक प्रकाशित होणार .... उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या नवी मुंबई,रायगडातील पत्रकारांचा पनवेल येथील सभेत झाला सन्मान
पनवेल:- मराठमोळ दै.पुण्यनगरी आपल रौप्यमहोत्सवी वर्ष साजरा करीत आहे,या निमित्ताने पनवेल येथे पुण्यनगरी समूहाची सभा झाली.या सभेत मराठी भाषा,संस्कृती आणि अस्मितेचा वेध घेणारा विशेषांक प्रकाशित करण्याचे ठरले.उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या नवी मुंबई,रायगडातील पत्रकारांचाही या सभेत मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
मराठी पत्रकारितेतील व्रतस्थ कर्मयोगी मुरलीधर बाबा शिंगोटे यांनी १९९९ साली दैनिक पुण्यनगरीची मुहूर्तमेढ रोवली.आजपर्यंत सातत्याने २५ वर्षे यशस्वीपणे घोडदौड करीत यावर्षी पुण्यनगरी हे मराठी वृत्तपत्र रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करीत आहे.या धर्तीवर दै. पुण्यनगरीची सभा पनवेल येथे पार पडली.याप्रसंगी संपादक रवि आमले,व्यवसाय प्रमुख समीर बिर्जे,कैलास डोके,वितरण प्रमुख रौनक अली,व्यवस्थापक राजेश खेडेकर,उपसंपादक अजित गडकरी,अजोयकुमार चूघ,विलास शेंडे,सचिन शिंगोटे यांच्यासह रायगड,पनवेल,उरण,नवी मुंबई कार्यक्षेत्रातील पत्रकार उपस्थित होते.
यावर्षी पुण्यनगरी या मराठमोळ्या दैनिकाच्या २५ व्या वर्धापनदिनपूर्तीच्या निमित्ताने मराठी भाषा,मराठी संस्कृती आणि मराठी अस्मिता या सगळ्यांचा सर्वांगिण वेध घेताना “मराठी पाऊल पडते कुठे?... अडते कुठे? - शोध मराठी बाण्याचा,बोध मराठी अस्मितेचा” या विशेषांकाच्या माध्यमातून विविध क्षेत्रात पुढे पडलेल्या मराठी पावलांचं कौतुक करतानाच,काही ठिकाणी मराठी पाऊल अडते कुठे,याचाही धांडोळा घेणार आहे. उद्योगांपासून शिक्षणापर्यंत आणि अंतराळापासून समुद्राच्या तळापर्यंत मराठी जनांनी फडकावलेल्या झेंड्याचा अभिमानाने पाठपुरावा करुन ज्ञानाच्या आणि विज्ञानाच्या क्षेत्रात झळाळणाऱ्या मराठी जनांना छानसं कोंदण देण्याचा अट्टाहास या विशेषांकाद्वारे केला जाणार आहे.
मराठी बाण्याची माहिती आणि महती सांगणारी ही पुरवणी दिनांक १५ ऑगस्ट २०२४ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.दै.पुण्यनगरीचा २५ वा वर्धापन दिन व भारताचा स्वातंत्र्य दिन याचे औचित्य साधून प्रसिद्ध होणारी ही पुरवणी संग्राह्य आणि वाचनीय असणार आहेच,त्यात दै.पुण्यनगरीचे वाचक, जहिरातदार,बातमीदार,संस्था, सामाजिक-राजकीय, लोकप्रतिनिधी यांच्यासह सर्व शुभचिंतकांचा समर्थ सहभाग असायलाच हवा,असे आवाहन संपादक रवि आमले व व्यवसाय प्रमुख समीर बिर्जे यांनी केले तसेच यावेळी मंचावर उपस्थित मान्यवरांनी व पत्रकारांनीही आपली मनोगते व्यक्त केली. सभेचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन पत्रकार साहिल रेळेकर यांनी केले.
वर्धापनदिनानिमित्त उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पत्रकारांना दरवर्षी पुण्यनगरी समूहातर्फे प्रोत्साहनपर पारितोषिके दिली जातात.मागील वर्धापनदिनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पनवेल-नवी मुंबई विभागात प्रथम साहिल रेळेकर,द्वितीय दिपक देशमुख,तृतीय जीवन केणी तर रायगड विभागात प्रथम मयुरी खोपकर व रवी शिंदे, द्वितीय प्रफुल्ल पवार आणि तृतीय संतोष पेरणे यांना मान्यवरांच्याहस्ते भेटवस्तू देऊन प्रोत्साहित करण्यात आले.
दै.पुण्यनगरी हे अग्रगण्य वृत्तपत्र यावर्षी रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करीत असताना सानंद अभिमान आहे.वस्तुनिष्ठ लेखन,वास्तवदर्शी बातम्या,नि:पक्षपातीपणा,सत्यता आणि सकारात्मकता या दै.पुण्यनगरीच्या गुणधर्मांमुळे गेली २५ वर्षे दै.पुण्यनगरीने मराठी वृत्तपत्र वाचकांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण केले आहे.दै.पुण्यनगरी कुठल्याही एककल्ली विचारांचा अवलंब करीत नाही.जनता आणि व्यवस्था यामधील दुवा जोडण्याचे काम दै.पुण्यनगरीने अचूकपणे केले आहे.त्यामुळे दै.पुण्यनगरीची ही घोडदौड अशीच अविरतपणे सुरू राहील.सर्व मायबाप वाचक, जाहिरातदार आणि हितचिंतकांचे मनःपूर्वक आभार.
- रवी आमले,संपादक
Post a Comment