पाणी प्रश्नावरुन करंजाडेवासीय सिडकोच्या विरोधात उतरले रस्त्यावर
पनवेल, दि.18 (वार्ताहर) ः गेल्या अनेक वर्षापासून करंजाडेवासियांना पाणी प्रश्नावरुन मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.सिडकोच्या गलथान कारभारामुळे करंजाडेवासियांचा पाण्याचा प्रश्न अद्यापही निकाली न निघाल्याने त्याच्या विरोधात आज करंजाडे पिपल्स फाऊंडेशनच्यावतीने मोठ्या संख्येने येथील रहिवाशांनी रस्त्यावर उतरुन सिडकोचा निषेध केला.
सामाजिक कार्यकर्ते विनोद साबळे,माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांच्यासह मोठ्या प्रमाणात माता-भगिनी व येथील नागरिक आज सकाळी जेएनपीटी हायवे रास्ता रोको करण्यासाठी रस्त्यावर उतरले होते व त्यांनी धडक मोर्चा काढून सिडकोच्या गलथान कारभाराचा पाढाच वाचला.गेल्या अनेक महिन्यापासून या परिसरात पाणी प्रश्न बिकट होत चालला असून त्यामुळे अनेकांनी आपली राहते घरे विकून दुसरीकडे राहण्यास गेले आहेत. सिडकोने या भागाचा विकास करताना पाणी प्रश्नाचे नियोजन करणे गरजेचे होते.परंतु ते न करता येथे फक्त इमारती उभारल्या गेल्या आहेत व येथील रहिवाशांना पाणी विकतचे घ्यावे लागत आहे.या सर्व गोष्टीचा आज येथील नागरिकांनी रस्त्यावर उतरुन निषेध केला आहे व सिडकोने त्वरित पाणी प्रश्न निकाली न काढल्यास आगामी अधिवेशनात करंजाडेवासियांचा मोर्चा त्यांच्यावर काढण्यात येईल,असा इशारा सामाजिक कार्यकर्ते विनोद साबळे यांनी दिला आहे.
Post a Comment