सिडकोतर्फे राबविण्यात येत असलेल्या 'अभय' योजनेस १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ ..... आमदार गणेश नाईक, आमदार प्रशांत ठाकूर,आमदार महेश बालदी यांची मागणी व पाठपुरावा
आमदार गणेश नाईक,आमदार प्रशांत ठाकूर,आमदार महेश बालदी यांची मागणी व पाठपुरावा आला कामी
पनवेल (प्रतिनिधी) सिडको वसाहत विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या 'अभय' योजनेस शासनाने १५ ऑगस्ट २०२४ पर्यंत मुदतवाढ दिली असून माजी मंत्री आमदार गणेश नाईक, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांनी शासनाकडे केलेली मागणी व पाठपुरावा कामी आला आहे.
सिडकोअंतर्गत अतिरिक्त भाडेपट्टा रक्कममध्ये तसेच वेळ मुदतवाढ आणि आवेजा रक्कमेत ५० टक्के सवलत देण्यासाठी दिनांक ३० जून २०२४ पर्यंत 'अभय योजना' राबविण्यात येत आहे.परंतु गेले जवळपास दीड ते दोन महिने लोकसभा निवडणुकीकरिता आचारसंहिता लागू झाल्याने व वसाहत विभागातील अनेक कर्मचाऱ्यांना निवडणूक संदर्भात जबाबदारी दिल्याने सदरचे प्रस्ताव सिडको वसाहत विभागाकडे प्रलंबित असून ते सर्व प्रस्ताव ३० जूनपर्यंत पूर्ण होणे अशक्यप्राय आहे. त्यामुळे सदर अभय योजनेला मुदतवाढ मिळावी अशी मागणी नागरिकांकडून होत होती.त्या अनुषंगाने सर्व सामान्य नागरिकांना जास्तीत जास्त लाभ मिळण्याच्या दृष्टीने माजी मंत्री व विद्यमान आमदार गणेश नाईक, आमदार प्रशांत ठाकूर,आमदार महेश बालदी यांनी राज्याचे नगरविकास प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करून पाठपुरावा केला. त्यानुसार सदरच्या मागणीवर शासनाच्या वतीने प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता यांनी गांभीर्याने विचार करत या अभय योजनेला १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे.त्यामुळे नागरिकांना त्याचा फायदा होणार असून आमदार गणेश नाईक,आमदार प्रशांत ठाकूर,आमदार महेश बालदी यांनी शासनाचे आभार व्यक्त केले आहे.
Post a Comment