ऐन पावसाळ्यात पनवेल तालुक्यात १३ टँकरने जवळपास चाळीस गाव-वाड्यामध्ये पाणीपुरवठा सुरूच
पनवेल (वार्ताहर) ः- जून महिना संपायला आला तरी देखील पनवेल तालुक्यात हवा तसा मुसळधार पाऊस पडलेला नाही.त्यामुळे पनवेल तालुक्यात 13 टँकरने जवळपास चाळीस गाव-वाड्यामध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.पावसाळा सुरू झाला आहे. मात्र मुसळधार पाऊस पडत नसल्याने अद्यापही पाणीटंचाई कमी झालेली नाही.14 जूनपर्यंत पनवेल तालुक्यात 50 ठिकाणी गाव-वाड्यांमध्ये पंधरा टँकरमार्फत पाणीपुरवठा सुरू होता.त्यानंतर कोरल आणि घेरावाडी येथील एक टँकरचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळे 14 टँकरने पाणीपुरवठा सुरू होता.या आठवड्यात वाजे येथील 11 ठिकाणचा एका टँकरने होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे.त्यामुळे सद्यस्थितीत तालुक्यात 13 ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. गत आठवड्यापासून तेरा गाव-वाड्यातील टँकरने पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे.त्यामुळे 37 ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
यात शिरढोण,आपटा,कसळखंड,वांगणी तर्फे वाजे,मालडुंगे,पालेबुद्रुक,खैरवाडी,वारदोली,वडघर, बारवई, नांदगाव,नानोशी,वांगणी तर्फे वाजे या ग्रामपंचायतमधील गाव-वाड्यांचा समावेश आहे. मुसळधार पाऊस पडल्यानंतर तालुक्यातील टँकरने पाणीपुरवठा बंद होऊ शकतो.हवामान खात्यामार्फत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र जून महिन्यातील 25 तारीख उजाडली तरी देखील सलग तीन ते चार दिवस पाऊस बरसला नाही.त्यामुळे नद्या, नाल्या तुडुंब भरून वाहत नाहीत.काही ठिकाणी एप्रिल- मे महिन्यातच बोअरवेलचे पाणी कमी झाले आहे. त्यामुळे मुसळधार पाऊस झाला तरच बोअरवेल आणि विहिरींना पाणी येईल आणि टँकरने होणारा पाणीपुरवठा बंद होईल.
Post a Comment