लग्न जुळविण्याच्या साईटवरुन तरुणीची फसवणूक... भामटयाला खारघर पोलिसांनी श्रीवर्धन येथून केली अटक
पनवेल दि, १९ (वार्ताहर): विवाहित असताना देखील लग्न जुळविण्याऱ्या साईटवरुन विवाहेच्छुक तरुणींना गाठून त्यांना लग्नाचे अमिष दाखवून वेगवेगळ्या बहाण्याने त्यांच्याकडून लाखो रुपये उकळून त्यांची फसवणूक करणाऱ्या नबील मुनीर खान (३०) या भामटयाला खारघर पोलिसांनी श्रीवर्धन येथून अटक केली आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी बँकेचे अधिकारी बनून त्याच्या घरापर्यंत जाऊन त्याला अटक केली आहे. या भामट्याने अशाच पद्धतीने अनेक तरुणींची फसवणुक केली असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.त्यानुसार पोलिसांकडुन त्याची अधिक चौकशी करण्यात येत आहे.
या प्रकरणातील आरोपी नबील मुनीर खान हा विवाहित असताना देखील त्याने काही महिन्यापुर्वी मेट्रीमोनीयल साईटवर लग्नासाठी आपली माहिती टाकली होती. त्यानंतर त्याने त्याच मेट्रीमोनीयल साईटवर स्वतःसाठी वराच्या शोधात असलेल्या खारघर येथील २८ वर्षीय तरुणीसोबत ओळख वाढवली होती, त्यानंतर त्याने सदर तरुणीला त्याचा दक्षिण आफ्रिका देशात मायनिंगचा तर मुंबईतील डोंगरी भागात टुर्स ऍन्ड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय असल्याचे सांगून तसेच तिच्यासोबत विवाह करण्याचे अमिष दाखवून तिचा विश्वास संपादन केला.त्यानंतर भामटया नबील याने वेगवेगळी कारणे सांगून तरुणीकडुन तब्बल ६ लाख ३१ हजाराची रक्कम उकळली होती.
मात्र त्यानंतर देखील नबीलकडून पैशांची मागणी सुरूच राहिल्याने तरुणीला त्याच्यावर संशय आला.त्यामुळे या तरुणीने त्याच्याकडे आपली रक्कम परत मागण्यास सुरुवात केली असता, त्याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली.त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे या तरुणीच्या लक्षात आल्यानंतर तीने खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे या आरोपीचा माग काढण्यास सुरुवात केली होती यादरम्यान,आरोपी नबील हा श्रीवर्धन येथे आपल्या गावी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव शेजवळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) अतुल आहेर, पोलीस कॉन्स्टेबल किरण पाटील, पोलीस नाईक मच्छिंद्र खेडकर, पोलीस शिपाई नितीन जावरे यांच्या पथकाने श्रीवर्धन गाठून आरोपीला बेड्या ठोकल्या.
Post a Comment