खारघरमधील बेलपाडा संपूर्ण डोंगर परिसराची आयुक्तांकडून पहाणी ...अतिक्रमण करणाऱ्यांवर पनवेल महापालिका करणार कडक कारवाई - आयुक्त डॉ.प्रशांत रसाळ
पनवेल : सध्या निवडणुकीची धामधुम सुरू असल्याचा गैरफायदा घेत पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात अनधिकृत झोपड्या,अतिक्रमण होत असल्यास अशा अनधिकृत झोपड्या व अतिक्रमण करणाऱ्यांवरती महापालिका कडक कारवाई करणार असल्याचे आयुक्त डॉ.प्रशांत रसाळ यांनी सांगितले आहे.
पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील खारघरमधील बेलपाडा डोंगरावरती अनधिकृतरित्या सुमारे 75 झोपड्या बांधण्यात आल्या होत्या,यावरती नुकतीच उपायुक्त मारूती गायकवाड,प्रभाग अधिकारी जितेंद्र मढवी यांच्या उपस्थितीमध्ये जेसीबीच्या साहाय्याने तोडक कारवाई केली होती.या डोंगराची आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ यांनी पहाणी केली. या ठिकाणी कारवाईनंतर निर्माण झालेला राडारोडा तत्काळ हटवून पुन्हा या डोंगरावरती अतिक्रमण होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना आयुक्तांनी यावेळी प्रभाग अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी उपायुक्त डॉ.वैभव विधाते व घनकचरा व स्वच्छता विभागप्रमुख अनिल कोकरे उपस्थित होते.यावेळी संपूर्ण डोंगर परिसर फिरून आयुक्तांनी पहाणी केली.
या कारवाईमुळे अशा प्रकारे अनधिकृतपणे झोपड्या, बांधकामे करणाऱ्यांवरती जरब बसली आहे.सध्या निवडणुकाचा काळ सुरू असल्याने अनधिकृत बांधकामांचे, अतिक्रमाणाचे पेव फुटत आहे.याबाबत सर्व प्रभाग अधिकाऱ्यांना आयुक्तांनी सक्त ताकिद दिली आहे.असे अतिक्रमण झालेले दिसून आल्यास त्यांवरती महापालिकेच्यावतीने कठोर कारवाई करणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले आहे.
Post a Comment