प्रकल्पग्रस्त ठेकेदारांवर अन्याय कशासाठी ? प्रकल्पग्रस्त विद्युत ठेकेदार संस्थेचे सिडकोला पत्र ..
पनवेल: सिडकोच्या विद्युत विभागाकडून रेल्वे प्रोजेक्टमधील विद्युत देखभालीकरिता निविदा काढण्यात येतात.या कामांमध्ये स्थानिकांना प्राधान्य द्यावे अशी मागणी प्रकल्पग्रस्त पात्र ठेकेदारांकडून वारंवार केली जात असून देखील सिडको प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप दि.बा.पाटील स्थानिक प्रकल्पग्रस्त विद्युत ठेकेदार सामाजिक संस्थेकडून करण्यात आला आहे.
याबाबत दि.19 रोजी सिडको व्यवस्थापकीय संचालकांना पत्र लिहुन सिडकोने काढलेल्या ई-निविदा थांबवून सदर निविदेमध्ये सिडको प्रकल्पग्रस्त विद्युत ठेकेदाराची अट टाकण्याची मागणी करण्यात आली आहे.या मुद्द्यावरून शेकाप आमदार जयंत पाटील यांनी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला आहे तर आमदार मंदा म्हात्रे आणि माजी आमदार बाळाराम पाटील यांनी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना याबाबत पत्र लिहून प्रकल्पग्रस्त ठेकेदारांची रास्त मागणी ई निविदेत समाविष्ट करण्याच्या सुचना केल्या आहेत.एकीकडे सिव्हील विभागाकडून काढण्यात येणाऱ्या रस्ते सफाई आणि स्वच्छता,आरोग्य केंद्र व पार्किंग या सारख्या कोट्यावाधीच्या ई-निविदेमध्ये स्थानिक प्रकल्पग्रस्त ठेकेदारांची अट टाकली जाते,परंतु आमच्या विद्युत स्थानिक प्रकल्पग्रस्त ठेकेदारांबाबत आपणाकडून कोणतीच सहानभूती नसल्याचा आरोप संघटनेचे अध्यक्ष रवींद्र शेळके यांनी केला आहे.याबाबत सिडकोने गांभीर्याने विचार करण्याची विनंती शेळके यांनी केली आहे.सिडको वारंवार प्रकंपग्रस्तांवर अन्याय करीत आली असून सिडकोचा हा प्रकार देखील स्थानिकांवर अन्याय करणाराच असल्याचा आरोप शेळके यांनी केला आहे.
Post a Comment