४० हजार रुपयांची लाच घेताना पनवेल तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक किरण गोरे याला रंगेहात पकडले ...अडीच महिना उलटूनही कामात टाळाटाळ
पनवेल - कुळकायदा कलम ३२ ग प्रमाणे अडीच एकर जमिन वर्ग २ मधून वर्ग १ करण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या महसूल सहाय्यकाला रंगेहात पकडण्यात आले.नवी मुंबई लाचलुचपत विभागाच्या पथकाने आज सायंकाळी ही कारवाई केली.
पनवेल तालुक्यातील गिरवले येथील शेतकरी जयदास कमलाकर गायकर यांची दोन वेगवेगळ्या नंबर असलेली अडीच एकर जमीन वर्ग २ मधून वर्ग १ करायची होती.यासाठी गायकर यांनी ३ जानेवारी रोजी पनवेल तहसीलदारांकडे अर्ज केला होता.शासकीय नियमानुसार हे काम ३० दिवसांच्या कालावधीत होणे अपेक्षित होते.आवश्यक सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही महसूल सहाय्यक पदावर काम करणारे किरण गोरे अडीच महिना उलटूनही कामात टाळाटाळ करीत होते.
मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियमाप्रमाणे या कामाची नजराणा व्यतिरिक्त कोणतेही पैसे लागत नाहीत. परंतु काम करण्यासाठी गोरे यांनी प्रति एकरला ४० हजार रुपये मागणी केली होती.त्याप्रमाणे १ लाख रुपये द्या तरच काम होईल असे सांगून कामात अडथळे निर्माण केले.दोन सर्वे नंबरपैकी एका सर्वे नंबरमध्ये अडथळा आल्यामुळे हे काम ४० हजारात करण्याचे ठरले.अशी माहिती तक्रारदार गायकर यांनी दिली. तहसीलदार विजय पाटील नायब तहसीलदार यांच्याकडे विनवणी करूनही काम पुढे सरकत नसल्यामुळे गायकर यांनी नवी मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास सापळा रचून ४० हजार रुपयांची लाच घेताना किरण गोरे या महसूल सहाय्यकाला रंगेहात पकडले. तहसीलदारांसह कार्यालयातील अनेक कर्मचाऱ्यांची लाच लुचपत विभागाकडून रात्री उशिरापर्यंत चौकशी आहे.
Post a Comment