आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीनुसार चार स्मशानभूमींसाठी १० कोटी रुपये मंजूर ....
पनवेल (प्रतिनिधी) महानगरपालिका क्षेत्रातील तळोजा फेज १, तळोजा फेज २, कोयनावेळे आणि घोट येथील स्मशानभूमी अंतर्गत कामे करण्यासाठी शासनाने निधी मंजूर केला आहे. सदरच्या कामासाठी निधी मिळण्याची मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली होती, त्यानुसार तब्बल १० कोटी रुपयांचा निधी शासनाने मंजुरी केला आहे.
"महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद" या योजनेंतर्गत पनवेल महानगरपालिका हद्दीतील तळोजा फेज १ भूखंड क्रमांक १० सेक्टर १५, तळोजा फेज २(पेंधर), कोयनावेळे आणि घोट येथील स्मशानभूमी अंतर्गत कामे करण्यासाठी शासनाने निधी देण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यानुसार तळोजा फेज १ भूखंड क्रमांक १० सेक्टर १५ येथील स्मशानभूमीसाठी ०२ कोटी ७५ लाख रुपये, तळोजा फेज २(पेंधर) करिता ०२ कोटी रुपये, कोयनावेळेसाठी ०२ कोटी ७५ लाख रुपये तर घोट येथील स्मशानभूमी करिता ०२ कोटी ५० लाख रुपये असा एकूण १० कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे आणि त्या संदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. परिसराचा झपाट्याने विकास होत असताना त्या ठिकाणी नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर सतत प्रयत्नशील असतात. मागील आठवड्यात पनवेलमधील तीन रस्त्यांच्या विकासासाठी ०५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्याचबरोबरीने पुन्हा आणखी एका विकासकामासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे, त्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
Post a Comment