छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने लोकसहभागातून महानगरपालिकेच्या सहकार्यातून पनवेल शहरामध्ये भव्य मिरवणूकीचे आयोजन ..मिरवणुकीमध्ये विविध शाळांनी, संस्थानी सहभागी होण्याचे आवाहन
पनवेल- 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने लोकसहभागातून महानगरपालिकेच्या सहकार्यातून पनवेल शहरामध्ये भव्य मिरवणूकीचे आयोजन करण्यात येणार आहे.पनवेल शहरामधील मिरवणूकीच्या नियोजनाची बैठक आयुक्त तथा प्रशासक श्री.गणेश देशमुख यांच्या सूचनेनूसार आज (8 फेब्रुवारी) जेष्ठ नागरीक संघाच्या सभागृहामध्ये घेण्यात आली.
यावेळी माजी सभागृहनेते परेश ठाकूर,सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक राजपूत,उपायुक्त गणेश शेटे,उपायुक्त कैलास गावडे, उपायुक्त डॉ.वैभव विधाते,वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे,वाहतूक निरीक्षक संजय पाटील, पोलिस निरीक्षक रमेश जाधव, महापालिका अधिकारी व कर्मचारी, माजी नगरसेविका, नगरसेवक, विविध जयंती मंडळाचे प्रतिनिधी,विविध शाळांचे प्रतिनिधी, विविध शासकीय संस्थाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावर्षी महापालिकेच्या माध्यमातून लोकसहभागातून छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.याचे नियोजन आजच्या बैठकित करण्यात आले.यानिमित्ताने लेझीम पथक, चित्ररथ,ढोल पथक,चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा यांची स्पर्धा होणार आहे.या मिरवणूकीमध्ये विविध शाळांनी, संस्थानी सहभागी होण्याचे आवाहन महापालिकेने केले असून आपल्या सहभागाची पूर्व नोंदणी महापालिकेकडे करणे गरजेचे असल्याचे उपायुक्त कैलास गावडे यांनी यावेळी सांगितले.
याबरोबरच सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक राजपूत यांनी छत्रपती शिवाजी महाराज भव्य मिरवणूकीस सर्व नागरिकांनी शांततामय वातावरणात सहकार्य करावे असे आवाहन केले. तसेच माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी स्वच्छता विभाग, सुरक्षा विभागास, विद्युत विभागास छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिवशी चोख व्यवस्था ठेवण्याबाबत सूचित केले.
दिनांक 19 फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजता छ. शिवाजी महाराजांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करून आणि आठ वाजता छ. शिवाजी महाराजांच्या पुतळयापासून मिरवणूकीची सुरूवात होईल. हुतात्मा स्मारक चौक,आदर्श लॉज,गावदेवी मंदिर, सावरकर चौक, मनपा मुख्यालय, सेवा योजन कार्यालय, मौलाना आझाद चौक मार्गे मिरवणूकीचा शेवट टपाल नाक्यावरील छ.शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळा चौकामध्ये होईल. याठिकाणी मिरवणूकीमध्ये सहभागी स्पर्धकांमधून विजेत्या स्पर्धकांची नावे घोषित करून त्यांना सन्मानित करण्यात येईल.
छ.शिवाजी महाराज जयंती उत्सवाचा खर्च लोकसहभागतून व प्रायोजकांच्या मार्फत केला जाणार आहे. नागरिकांनी वर्गणी देण्यासाठी महापालिकेशी संपर्क साधावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले.
Post a Comment