बेपत्ता चार शाळकरी मुली सुखरूप परतल्या घरी ... पनवेलच्या मुर्बी जिल्हा परिषद शाळेत आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनी
पनवेल दि.२९ (वार्ताहर): पनवेल तालुक्यातील मुर्बी गावातील रायगड जिल्हा परिषद शाळेमध्ये आठवीत शिक्षण घेणाऱ्या चार मुली बेपत्ता झाल्याने या मुलींचे पालक धास्तावले होते.मात्र,दिवसभर शोध घेतल्यानंतर रात्री बारा वाजताच्या सुमारास चारही मुली सुखरुप खारघर रेल्वे स्थानकावर आढळून आल्याने पोलीस, शिक्षक आणि पालकांनी सुटकेचा निश्वास टाकला.मुर्बी गावातील रायगड जिल्हा परिषद शाळेत नियमितपणे विद्यार्थी-विद्यार्थिना आपापल्या वर्गात दाखल झाल्या. त्यानंतर आठवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या चार मुली सकाळच्या सुमारास दप्तर वर्गात सोडून शाळेबाहेर पडल्या होत्या.दुपार झाल्यानंतरहीं मुली वर्गात निदर्शनास येत नसल्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी परिसरात शोध घेतला असता,या मुली आढळून आल्या नाहीत.त्यामुळे याची माहिती त्यांच्या पालकांना आणि पोलिसांना देण्यात आली.याबाबत पोलिसांनी या प्रकरणाची नोंद करुन पालक आणि शिक्षकांच्या मदतीने शोध घेतला असताना चारही मुली रात्री बारा वाजताच्या सुमारास खारघर रेल्वे स्थानकावर आढळून आल्या. त्यानंतर पोलिसांनी मुलींची समजूत काढून त्यांना पालकांच्या स्वाधीन केले.
Post a Comment