News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

पनवेल परिसरातील पाणी पुरवठ्यातील अडचणी लवकरात लवकर दूर करा - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

पनवेल परिसरातील पाणी पुरवठ्यातील अडचणी लवकरात लवकर दूर करा - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

पनवेल -  पनवेल महानगरपालिका हद्दीतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याच्या दृष्टिकोनातून पाणी पुरवठ्यातील अडचणी लवकरात लवकर दूर करा,असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱयांना मुंबईत झालेल्या बैठकीत दिले. 

पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील पाणी समस्या दूर करण्यासंदर्भात तातडीने उपाययोजना करण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक पार पडली. या बैठकीस आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, नगरविकास पाणी पुरवठा सचिव संजय खंदारे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन शर्मा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी नगरसेवक नितीन पाटील, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, प्रल्हाद केणी,कामोठे शहर अध्यक्ष रवी जोशी, खारघर अध्यक्ष प्रवीण पाटील, कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील, माजी नगरसेविका रुचिता लोंढे, माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, ऍड.चेतन जाधव, पनवेल महानगरपालिकेचे पाणी पुरवठा अधिकारी विलास चव्हाण यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. 

पनवेल महानगरपालिका स्थापन होऊन जवळपास सहा वषपिक्षा अधिक काळ उलटून गेला असून महापालिका क्षेत्राअंतर्गत नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी पनवेल महापालिकेस मुख्यत्वे सिडको,एमआयडीसी, जलसंपदा विभाग आदी प्रशासनावर अवलंबून रहावे लागत आहे. त्यामुळे बऱ्याचवेळा या प्रशासनांकडून पाणी पुरवठयाबाबत दिरंगाई झाल्यास त्याचा सर्वात जास्त त्रास महापालिका क्षेत्रातील पाणी पुरवठयाला होत असते आणि त्यामुळे अनेक वेळा तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. पनवेल महापालिकेस पाणीपुरवठा करण्यासाठी स्वतःचा असा पूर्ण क्षमतेचा स्वतंत्र जलस्त्रोत उपलब्ध नाही, त्यामुळे त्यांना कायमच दुसऱ्यांवर विसंबून राहावे लागते. पनवेल महापालिकेसाठी पाण्याचे स्वतंत्र आरक्षण असावे असा प्रस्ताव व पत्रे जलसंपदा विभागास पाठविण्यात आली असून त्याबाबत तातडीने निर्णय होणे गरजेचे आहे. तसेच सद्यस्थितीतील तूट भरून काढण्याकरिता पाताळगंगा नदीतून तातडीने प्रतिदिन १० दश लक्ष लिटर पाणी आरक्षण मिळण्याचा प्रस्ताव कोकण पाटबंधारे विभाग जलसंपदा कार्यकारी संचालक यांच्या कार्यालयाकडे मुख्य अभियंता जलसंपदा विभाग कार्यालयाकडून सादर करण्यात आला आहे तसेच पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील भविष्यातील पाण्याचे नियोजन करण्यासाठी जलसंपदा विभागाच्या कोलाड येथील डोलवाल बंधाऱ्यातून प्रतिदिन ५०० दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणी आरक्षणाचा प्रस्ताव कोकण पाटबंधारे विभाग जलसंपदा कार्यकारी संचालक यांच्या कार्यालयाकडे सादर करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने पनवेल महानगरपालिका अंतर्गत पाणी टंचाई कमी होण्याच्या दृष्टिकोनातून तातडीने अंमलबजावणी करण्याची आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. त्याचबरोबर नवी मुंबई महापालिकेकडून पनवेल महानगरपालिका क्षेत्राला व शेजारील गावांना सुद्धा आवश्यकतेप्रमाणे पाण्याचे कनेक्शन दिले पाहिजेत, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली. तर बाळगंगा धरणाची भूसंपादन प्रक्रिया तातडीने करण्याची आवश्यकता आहे तसेच पनवेल परिसरातील छोट्या धरणातून पाणी पुरवठा होऊ शकतो त्यासाठी शासनाने लवकरात लवकर निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे आमदार महेश बालदी यांनी या चर्चेदरम्यान अधोरेखित केले. 
 
यावेळी झालेल्या चर्चेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेत तात्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासित केले. पाताळगंगा नदीतून तातडीने प्रतिदिन १० दश लक्ष लिटर पाणी व कायमस्वरूपी उपाय म्हणून डोलवाल बंधाऱ्यातून प्रतिदिन ५०० दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणी आरक्षणाचा प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करण्याचे सूतोवाच त्यांनी केले. त्याचबरोबरीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत येणाऱ्या न्हावा शेवा टप्पा-३ चे काम सप्टेंबर महिन्यापर्यंत पूर्ण करणार असल्याची खात्री त्यांनी दिली. तसेच या सर्व प्रक्रियेत तात्काळ कार्यवाही होण्यासाठी पाणी पुरवठ्यातील अडचणी लवकरात लवकर दूर करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. त्याचबरोबरीने आगामी उन्हाळा पाहता पनवेलमध्ये पाणी टंचाई होऊ नये यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून तात्काळ नविन पंप यंत्रणा कार्यान्वित करून फेब्रुवारी अखेर पर्यंत प्रतिदिन २५ दशलक्ष लिटर पाणी वाढवून देण्याची कार्यवाही करण्याची सूचना त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. 

पनवेल महानगरपालिका हद्दीत मोठ्या प्रमाणात नागरीकरण वाढत आहे, या अनुषंगाने पाण्याच्या नियोजनावर ताण येत असते. पाणी पुरवठा कायम व्हावा, यासाठी योग्य उपाययोजनांची गरज होती. आमचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पनवेलच्या बाबतीत नेहमीच सहकार्याची भूमिका घेतली आहे. पनवेलच्या विकासात त्यांचा मोलाचा वाटा आहे. पाणी पुरवठा संदर्भात त्यांनी केलेल्या सूचना व निर्देशामुळे पनवेलकरांना मोठा फायदा होणार आहे. त्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. - 
आमदार प्रशांत ठाकूर 

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment