ड्रोनद्वारे तळोजा कारागृहाचे चित्रीकरण करणाऱ्यावर गुन्हा दाखल
पनवेल : विविध दहशतवादी संघटनेचे - दहशतवादी, गँगस्टर, नक्षलवादी यांच्यामुळे अतिसंवेदनशील बनलेल्या तळोजा कारागृहाचे अज्ञात व्यक्तीने ड्रोन कॅमेऱ्याद्वारे चित्रण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.विशेष बाब म्हणजे कारागृहाचा बेकायदा व्हिडीओ काढणाऱ्या व्यक्तीने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर टाकून तळोजा मध्यवर्ती कारागृहाची सुरक्षितता धोक्यात आणली आहे.खारघर पोलिसांनी या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून ना त्याचा शोध सुरू केला आहे.या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या अज्ञात व्यक्तीने ड्रोन कॅमेऱ्याद्वारे तळोजा कारागृह परिसरातील प्रतिबंधित क्षेत्राचे विनापरवानगी अवैधरीत्या चित्रण केले. त्यानंतर हा व्हिडीओ त्याने इन्स्टाग्रामवर अपलोड केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तळोजा कारागृह प्रशासन खडबडून जागे झाले. त्यानंतर कारागृह प्रशासनाने या व्हिडीओबाबत माहिती घेतली असता, तळोजा कारागृहातील प्रतिबंधित क्षेत्रातील कैद्यांचे व तुरुंग परिसराचे ९.४२ वाजता ड्रोन कॅमेऱ्याद्वारे चित्रण केल्याचे आढळून आले. त्यानंतर हा व्हिडीओ आर्चिस लिमये याच्या अकाउंटद्वारे 'राहुल उत्तेकर इन स्टोरी' या नावाने सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्याचे आढळून आले.
तळोजा मध्यवर्ती कारागृहाची सुरक्षितता धोक्यात आणण्याच्या तसेच, शासकीय गुप्ततेचा भंग करण्याच्या उद्देशाने हा प्रकार केल्याचे आढळून आले. या प्रकारामुळे कारागृहातील सुरक्षेला धोका निर्माण झाल्याने तुरुंग अधिकाऱ्यांनी खारघर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल करून त्या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे.
Post a Comment