कुष्ठरोग निवारण समिती शांतीवनच्या विश्वस्त मीराताई लाड यांचे निधन
पनवेल- (यशवंत बिडये) पनवेलजवळील कुष्ठरोग निवारणाचे व कुष्ठरुग्ण बांधवांच्या पुनर्वसनाचे कार्य करणारी 'कुष्ठरोग निवारण समिती शांतीवन' ही संस्था कर्तृत्वाने मोठ-मोठ्या अश्या व्यक्तींच्या सहकार्याने सुरू आहे.मीराताई लाड त्यापैकीच एक. ही संस्था मोठी होण्यामध्ये ज्या ज्या व्यक्तींचा हातभार होता त्यातीलच एक नाव म्हणजे 'मीराताई लाड'.सोमवार दिनांक २९ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी मीराताई लाड यांची कुष्ठरोग निवारण समिती शांतीवन याच त्यांच्या कर्मभूमीत त्यांची प्राणज्योत मालवली.
ताई या हाडाच्या शिक्षिका.मुंबईतील चिकित्सक समूह' विद्यालय, विलेपार्ले येथील 'माधवराव भागवत हायस्कूल' अश्या नावाजलेल्या शाळातून त्यांनी अध्यापनाचे कार्य केले. त्यांचे पती 'एअर इंडिया' या कंपनीत कामाला होते. ते गुरुदेव रानडे यांचे शिष्य होते.त्यामुळे ते आध्यात्मिक विचारसरणीमध्ये वावरायचे तर मीराताई या राष्ट्र सेवा दलाच्या सैनिक.बॅरिस्टर नाथ पै यांच्यासारख्या दिग्गज व्यक्तिमत्त्वांचा सहवास लाभला त्यामुळे विचारांची बैठक पक्की झाली. ताईंना राष्ट्र सेवा दलाच्या कार्याबद्दल व कार्यकर्त्यांबद्दल विशेष आत्मीयता होती.
बऱ्याचवेळा पती, पत्नी दोघे वेगवेगळ्या विचार सरणीचे असतील तर त्यांच्या संसारामध्ये भांडणे होतात;परंतु या विषयांवर त्या दोघांचेही कधी मतभेद झाले नाहीत. त्यांनी आपले विचार, आपली तत्वे, आपले आदर्श संसारात डोकाऊ दिले नाहीत.
त्यांना 'राजीव' (मुलगा) व 'रजन' (मुलगी) ही दोन अपत्ये. दोघांनाही चांगले शिक्षण घेतले होते. सर्वकाही सुरळीत चालले होते; परंतु ताईंच्या आयुष्यात अतिशय दुःखद घटना घडली. राजीव व रजन या दोघांचेही निधन झाले. लाड काका व ताई दोघांनाही मन खंबीर केले आणि रडत न बसता त्यांची चिरकाल आठवण राहावी म्हणून 'राजीव-रजन लाड ट्रस्ट' या ट्रस्टची स्थापना केली. लाड काका एअर इंडियातून निवृत्त झाल्यावर मिळालेले निवृत्ती वेतन, लाड ताई शिक्षिका म्हणून स्वेच्छा निवृत्तीमुळे मिळालेले वेतन, आपली सर्व संपत्ती ही या ट्रस्टमध्ये गुंतवली. म्हणजे ताईंनी खऱ्या अर्थाने तन, मन आणि धन अर्पून समाजकार्य केले. समाजासाठी,समाजातल्या शेवटच्या माणसाच्या कल्याणासाठी त्या कार्य करत होत्या.
ताईंवर राष्ट्र सेवा दलाचे संस्कार असल्याने व समाजातील शेवटच्या माणसाबद्दल कणव असल्याने आपल्याला वेगळ्या प्रकारचे समाजकार्य करायचे आहे असे त्यांनी घरात बोलून दाखवले. त्यांना बाबा आमटे यांचे कार्य चाललेल्या 'आनंदवन' चे काम समजून घेऊन तिथे काम करायचे होते; परंतु त्यांच्या एका सहकाऱ्यांनी पनवेल जवळील 'शांतीवन' या संस्थेचे नाव सुचवले आणि शांतिवनात कामाला सुरुवात झाली.
कुष्ठरोग निवारण समिती शांतीवन येथे 'रामकृष्ण निकेतन' या वृद्धाश्रमाची सुरुवात झालेली होती. जो पर्यंत स्वतः स्नान करता येते, स्वत:च्या हाताने जेवण करता येते. इथपर्यंत स्वावलंबी आहे तो पर्यंत तिथे ठेवले जायचे. एक आजी परावलंबी झाल्या. त्यांच्या घरच्यांनी आग्रह केला. यांना याच वातावरणात ठेवा. वेगळे मनुष्यबळ द्या. आर्थिक बाजू आम्ही सांभाळू. त्यातून ताईंना परावलंबी व्यक्तींसाठी 'आधारघर' ही संकल्पना सुचली. त्या आधी महाराष्ट्रात आधारघर ही संकल्पना कुणालाही माहीत नव्हती. त्यामुळे आधारघर या संकल्पनेच्या त्यांना जनक म्हटले तरी वावगे ठरणार नाही. सध्याची समाजाची मानसिकता लक्षात घेता आयुष्याची संध्याकाळ सुखावह जावी यासाठी आधारघरांची आवश्यकता आहे असे दिसत आहे.
या विचारातून 'राजीव रजन आधारघर' ही संकल्पना सुचली. महाराष्ट्रात आज बरीच आधारघर आहेत; परंतु 'राजीव-रजन आधारघर' या सर्वांची मातृसंस्था आहे. हे वास्तव आहे. आज समाजात त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन अनेकांनी आधारघरांची सुरुवात केली. त्यांना सामाजिक, आर्थिक व वैयक्तिकरीत्या जी मदत करता येईल ती मदत केली.
ताई शिक्षिका असल्याने हिंदी, मराठी, इंग्रजी या भाषांवर प्रभुत्व होतेच; परंतु पती एअर इंडियात असल्याने सर्व जग फिरलेल्या त्यामुळे तिकडच्याही बऱ्याच भाषा त्यांना अवगत होत्या.
एखादी गोष्ट व्यवस्थित समजत नाही तोपर्यंत ती समजून घेण्याची त्यांची सवय होती. हा त्यांच्या चिकित्सक व एखाद्या गोष्टीबद्दल कुतूहल जाणून घेण्याच्या स्वभावामुळे त्या म्हणायच्या मी अजूनही विद्यार्थीच आहे.
'लाख मेला तरी चालतील तरी लाखाचा पोशिंदा राहिला पाहिजे' असे वाक्य आपल्याला सर्रास ऐकायला मिळते; परंतु ताईंना हे कधीच पटले नाही. कारण कुठलेही काम करताना त्याचा शेवटच्या माणसावर काय परिणाम होणार आहे याचा विचार करायच्या. त्या म्हणायच्या लाखच राहिले नाहीत तर पोशिंदा राहून कुणाला पोसणार आहे. त्यामुळे ताई बोलतानाच विचार करायच्या आणि एखादी गोष्ट बोलल्यावर मागे फिरणे नाही.
कुष्ठरोग निवारण समिती शांतीवन या संस्थेसाठी त्यांनी आपले सर्वस्व वाहिले. या संस्थेतील रामकृष्ण निकेतन वृद्धाश्रम, स्नेहलता निसर्गोपचार केंद्र, श्री.अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे आश्रमशाळा, विणकाम आदी सर्व विभागात फक्त पदाधिकारीच नाही तर सामान्य कार्यकर्ता म्हणून काम केले. त्या म्हणायच्या पहिली मी कार्यकर्ता आहे नंतर पदाधिकारी.संस्थेच्या कार्याध्यक्ष पदाची त्यांनी समर्थपणे जबाबदारी सांभाळली होती. तसेच शेवटपर्यंत त्या विश्वस्त होत्या. विविध संस्थांवर विविध जबाबदाऱ्या सांभाळताना त्या पदाला आपल्याला योग्य न्याय देता येईल का? याचा विचार करूनच त्या ते पद सांभाळायचा. कुठल्याही पदाचा गैरवापर होणार नाही यासाठी त्या दक्ष असायच्या. ज्या आधार घराची त्यांनी सुरुवात केली. त्याच कर्मभूमीत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मरणोत्तर देहदान करण्याची त्यांची इच्छा होती. त्याप्रमाणे काल एम.जी.एम. (MGM) हॉस्पिटल मध्ये त्यांचे शव देण्यात आले.
ताईंच्या जाण्यानं समाजात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.त्यांची जागा भरून काढणे कुणालाही शक्य नाही. त्यांनी दाखविलेल्या मार्गाने प्रामाणिकपणे कार्य करत राहणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल.
Post a Comment