पनवेलच्या टेंभोडेवासियांचा प्रश्न सोडवण्यास जिल्हाधिकारी यांचे सकारात्मक आश्वासन : मुंबई ऊर्जा कंपनीचे टॉवर उभारण्यास ग्रामस्थांचा विरोध
पनवेल (संजय कदम): पनवेल तालुक्यातील टेंभोडे येथे मुंबई ऊर्जा कंपनीचे टॉवर उभारण्याचे काम सुरु करण्यास ग्रामस्थांनी विरोध केला असून, गेल्या २ दिवसांपासून हे सुरु होणारे काम बंद पाडून तेथे स्थानिक ग्रामस्थांनी व स्थानिक संघर्ष समितीने ठिय्या आंदोलन छेडले होते. या संदर्भात आज अलिबाग येथे जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली असता, वरिष्ठ स्तरावर चर्चा करून टेंभोडेवासियांचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू असे सकारात्मक आश्वासन जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी शिष्टमंडळाला दिले आहे.
यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे जिल्हासंपर्कप्रमुख बबन पाटील, माजी आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार पंडित पाटील, माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, पनवेल काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे महानगरप्रमुख एकनाथ म्हात्रे, पनवेल शहर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष हेमराज म्हात्रे, प्रकाश म्हात्रे, यांसह ग्रामस्थ या बैठकीला उपस्थित होते. यावेळी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे जिल्हासंपर्क प्रमुख बबनदादा पाटील यांनी ग्रामस्थांची बाजू मांडताना उभारण्यात येणारे टॉवर हे भुयारी मार्गे किंवा बाजूला असलेल्या डोंगराळ भागातून न्यावे अशी मागणी केली.यादृष्टीने सखोल अभ्यास करून तसेच वरिष्ठ स्तरावर चर्चा करून योग्य मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो असे आश्वासन जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी दिले तर माजी आमदार बाळाराम पाटील यांनी शासनाने राजकीय भांडवल न करता भूमिपुत्रांना न्याय द्यावा अशी मागणी केली. या संदर्भात राज्याचे विरोवी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची सुद्धा भेट घेणार असून वेळ आल्यास मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ग्रामस्थांचे बाजू व भूमिका त्यांच्या समोर मांडू असे त्यांनी सांगिलते आहे.
Post a Comment