भर पावसात मणिपूर अत्याचार,विद्वेषाचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पनवेलतर्फे निषेध : राष्ट्रपतींना तहसीलदारांच्या मार्फत निवेदन
पनवेल- भर पावसात मणिपूर हिंसाचाराचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पनवेलतर्फे पनवेलच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये निषेध करण्यात आला.
मणिपूर येथील हिंसाचार,महिलांवरील लैंगिक अत्याचार आणि विद्वेषाचा निषेध करण्यासाठी पनवेल येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पनवेल शाखेचे कार्यकर्ते तसेच संविधान प्रचारक,डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक व सांस्कृतिक मंडळ व इतर समविचारी साथी सहभागी झाले.भर पावसात संध्या. ७ वाजता रस्त्यावरून जाणारे नागरिकसुद्धा काही वेळ ह्या आंदोलनात सामील झाले.
मणिपूरमधला हिंसाचार आणि महिलांवरील लैंगिक अत्याचार हा आपल्या लोकशाहीवरचा आघात आहे, त्याचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत.गेल्या दोन महिन्यापेक्षा जास्त काळ मणिपूर विद्वेषाच्या राजकारणात होरपळते आहे आणि तिथल्या बातम्या दडपल्या जात आहेत.मणिपूरमध्ये भर दिवसा दोन स्त्रियांना विवस्त्र करून धिंड काढली जाते, त्यांच्यावर लैंगिक हल्ले होतात, या घटनेचा व्हिडिओ अनेक दिवसांनी सर्वांसमोर येतोय.मात्र अशा अनेक घटना लागोपाठ घडतच आहेत हे अत्यंत संतापजनक आणि मानवतेला काळीमा फासणारे आहे.
यावेळी महाराष्ट्र अंनिसच्या राज्य महिला सहभाग कार्यवाह आरती नाईक,राज्य युवा सहभाग कार्यवाह प्रियांका खेडेकर,शाखा कार्याध्यक्ष,तनुश्री खातू, संविधान प्रचारक स्वाती जठार,कांबळे सर,महेंद्र नाईक, करुणा तांडेल,ज्योती क्षीरसागर, प्रियांका जावरे, नाजूका सावंत इत्यादींनी आपली मनोगते व्यक्त केली तसेच राष्ट्रपतींना तहसीलदारांच्या मार्फत निवेदनही देण्यात आले.
संवेदनशील आणि सजग नागरिक, संघटनांनी सहभागी होऊन आपली अस्वस्थता व्यक्त करूया अशी अपेक्षा व्यक्त करत हे आंदोलन पार पडले. जास्तीत जास्त संख्येने युवा आणि महिला ह्या घटनेबाबत व्यक्त झाल्या.
Post a Comment