रस्त्यावर मलवाहिनीचे पाणी...खारघर भाजपच्या माजी नगरसेवकांचा सिडको कार्यालयात ठिय्या
पनवेल - गेली अनेक दिवस खारघरच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात मलवाहिनीतून (सिव्हरेज लाईन) पाणी आणि घाण वाहून येत असल्याने त्यावर उपाययोजना करावी म्हणून संबंधित सिडकोच्या अधिकाऱ्यांना भाजपच्या खारघरमधील सर्वच माजी नगरसेवकांनी वारंवार सांगून सुद्धा कारवाईच होत नसल्याने अखेर या माजी नगरसेवकांनी सिडको भवनामध्येच अधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये ठिय्या ठोकला.
खारघरमधील रस्त्यावरील घाण पाणी संदर्भात सातत्याने कारवाई करण्यासंदर्भात सांगितले जात होते परंतु गेले आठवडाभर यावर कोणतीच कारवाई न झाल्याने रस्त्याच्या मधोमध असलेल्या ड्रेनेज लाईनच्या टाक्यांमधून घाण येण्याचे सुरूच होते,शेवटी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोचे अधिकारी ऐकत नसतील तर त्यांना समजेल अशा भाषेत विचारणा करा असे आदेश दिल्यावर खारघर भाजपाचे सर्व माजी नगरसेवक अभिमन्यू पाटील,नरेश ठाकूर,निलेश बाविस्कर,नेत्रा पाटील,अनिता पाटील,हर्षदा उपाध्याय,आरती नवघरे,किर्ती नवघरे,अमर उपाध्याय,समीर कदम,वासुदेव पाटील व इतर कार्यकर्ते यांनी सिडकोचे अधिक्षक अभियंता मूल यांचे सिडको भवनमधील दालन गाठले.
यावेळी मूल यांना यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली, सदर उत्तरांनी समाधान न झाल्याने सर्व माजी नगरसेवकांनी त्यांच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला,दीड ते दोन तास चाललेल्या ठिय्या आंदोलनानंतर मूल हे आमच्या मागणीवरून आमच्यासोबत खारघरच्या एसटीपी प्लांटची खुद्द पाहणी करण्यास तयार झाले.
खारघरच्या सेक्टर 17 येथील एसटीपी प्लांट या ठिकाणी भेट दिली असता अधिकारी यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने तेथे शाब्दिक चकमकी उडाल्या. सर्वच माजी नगरसेवकांनी आक्रमकपणे मागणी केल्यानंतर येणाऱ्या आठवड्यात आणखीन एक पंप दुरुस्त करून सदरच्या ठिकाणांची तिन्ही पंप सुरू करण्यात येतील असे आश्वासन दिले आहे,परंतु या कामात हयगय केल्यास खारघर भाजपा सिडकोच्या अधिकाऱ्यांना समजेल अशा भाषेत उत्तर देण्यात सज्ज असल्याचे खारघर भाजपा सरचिटणीस कीर्ती नवघरे यांनी सांगितले.
Post a Comment