नागरिकांच्या पाणी प्रश्नावर ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या महिला आघाडीची सिडको कार्यालयाला धडक
पनवेल (संजय कदम) : नवीन पनवेलमध्ये अनियमित होणाऱ्या पाणी पुरवठयामुळे नागरिक प्रचंड संतापले आहेत. याचा जाब विचारण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महिला आघाडीने आज सिडको कार्यालयावर धडक दिली आणि अपुऱ्या आणि अनियमित पाणी पुरवठ्याबाबत जाब विचारला.
अनियमित होणाऱ्या पाणी पुरवठयामुळे नविन पनवेलचे नागरिक प्रचंड त्रास सहन करत आहेत तसेच वर्षानुवर्ष हिच समस्या निर्माण होते.याबाबत महाराष्ट्र जलप्राधिकरण कार्यालयाला जाब विचारल्यास त्यांच्याकडून मुबलक पाणी दिले जात असल्याचे सांगून हात वर करण्यात येते तर सिडकोकडे जाब विचारल्यास अपुऱ्या पाणीपुरवठा होत असल्याचे सांगण्यात येते. यामुळे सिडको आणि जलप्राधिकरण कार्यालयातील अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन नागरिकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यावी यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष नवीन पनवेल महिला आघाडीच्या संघटिका अपूर्वा प्रभू यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक महिलांनी सिडको कार्यालयावर धडक दिली आणि पाणी पुरवठ्यात नेमकी अडचण काय याचा जाब विचारला तसेच पाणीपुरवठा सुरळीत व्हावा याबाबत सिडको कार्यकारी अभियंता श्री. जगदाळे यांना निवेदन दिले.
Post a Comment