लेखक गज आनन म्हात्रे यांच्या 'खाडीवरची माडी' कादंबरीवर पनवेलमध्ये चर्चासत्र : कादंबरी म्हणजे प्रेम,प्रेमाची संघर्ष कथा ...
पनवेल- पुस्तके ही साहित्यिकांसाठी वैभवच असल्याचे प्रतिपादन कोकण मराठी साहित्य परिषदेचे जनसंपर्कप्रमुख,रायगडभूषण प्रा.एल.बी.पाटील यांनी कोकण मराठी साहित्य परिषद,नवीन पनवेल शाखा व के.गो.लिमये सार्वजनिक वाचनालय,पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेलच्या के.गो.लिमये सार्वजनिक वाचनालयात लेखक गज आनन म्हात्रे यांच्या 'खाडीवरची माडी' कादंबरीवर आयोजित चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी केले.
या चर्चासत्रात प्रमुख वक्ते अॅड. साहित्यिका सुनिता जोशी, साहित्यिक डॉ.अविनाश पाटील, व्याख्याते योगेशचंद्र लोहकरे, लेखक घनश्याम परकाले,लेखक- पत्रकार सुधाकर लाड, कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी यांनी सहभाग घेतला.
खाडीवरची माडी या कादंबरीचे लेखक गज आनन म्हात्रे यांनी, प्रेमात पडलो असतो तर काय घडले असते? याचे वास्तव चित्र माडीवरची खाडी या कादंबरीतील रेखाटलेले आहे.कथा घडली नाही घडावी असं वाटत होतं. पुस्तकात सुखाचे शब्द टिपले आहेत. कादंबरीमध्ये शोकांतिका ऐवजी सुखांतिका अशा स्वरूपात ही कादंबरी असल्याचे त्यांनी सांगितले.
व्याख्याते योगेशचंद्र लोहकरे यांनी चर्चासत्रात पुस्तकाविषयी विस्तृत चर्चा केली त्यांनी, कुठल्याही लेखकाच पुस्तक हे त्याच आत्मचरित्रच असते.खाडीवरची माडी या पुस्तकात आत्मभान, आत्मजाणीव,आत्मविष्कार लेखकाचा प्रकट झालेला दिसतो. कथा असेल किंवा कुठलेही पुस्तक हे सामाजिक इतिहास,सामाजिक दस्तऐवज असते.लेखकाचे विचार पुस्तकात डोकावत असतात. पुस्तकामधून लेखकाची गतकातर्ता दिसते असे सांगितले.साहित्यिक डॉ.अविनाश पाटील यांनी, खाडीवरची माडी या नावावरून एक कादंबरी रहस्यमय असावी असे वाटते पण ही कादंबरी प्रेम कथा आहे, प्रेमाची संघर्ष कथा आहे असे त्यांनी सांगितले.
साहित्यिका अॅड.सुनिता जोशी यांनी, कुठल्याही साहित्यिकाची सुरुवात कवीपासून होते.लेखक गजानन म्हात्रे यांनी या वयातही प्रेम कथा कादंबरी लिहिली हे त्यांचे धाडसच म्हणावं लागेल. सफल प्रेम कथा असलेली ही कादंबरी असल्याचे त्यांनी सांगितले. लेखक सुधाकर लाड यांनी, खाडीवरची माडी या पुस्तकातून आगरी-कोळी समाजाचे दर्शन होते.या कादंबरीवर चित्रपट निघावा अशी त्यांनी सांगितले. लेखक घनश्याम परकाले यांनी, पुस्तकातील भाषा मनाला भिडणारी असून समाज,निसर्ग मानवी जीवनाचे दर्शन या कादंबरीतून होत असल्याचे सांगितले. प्रा.एल.बी पाटील यांनी, नुकताच प्रकाशन झालेली खाडीवरची माडी या कादंबरीवर चर्चासत्र आयोजित करणे हे लेखकासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी यांनी प्रास्ताविक व उपस्थितांचे आभार मानले. व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत साहित्यिका,के.गो.लिमये सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षा सुनीता जोशी यांनी केले.
Post a Comment