पनवेल तालुक्यात २३ बोगस शाळा : प्रवेश घेण्यापूर्वी शाळेच्या मान्यतेबाबत चौकशी करा
पनवेल- पनवेल तालुक्यात बोगस शाळांचा आकडा उघड करण्यास पनवेल पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला यश आले. मान्यताप्राप्त शाळांना हाताशी धरून शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचा कागदोपत्री शाळाप्रवेश मान्यता प्राप्त शाळांमध्ये करून विद्यार्थ्यांना शिक्षण स्वतः:च्या बोगस शाळेत दिले जात असल्याचे समोर आले आहे.रायगड जिल्ह्यातील बेकायदा शाळांची यादी रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडून नुकतीच जाहिर केली.
यामध्ये पनवेल तालुक्यातील २३ शाळांचा समावेश आहे. यामध्ये विनायक केशव जोशी मेमोरियल नवजीवन इंटरनॅशनल स्कूल टोल नाका आपटा फाटा, दि इंग्लिश स्कूल, उलवा,न्यू इंग्लिश स्कूल कोपरा, रोहिंजण इंग्लिश स्कूल रोहिंजण,आकृती एज्युकेशनल अँड वेलफेअर सोसायटीचे एस.एम.बी.इंटरनॅशनल स्कूल उलवे, मार्शमेलोज इंटरनॅशनल स्कूल ओवे,तुळजाभवानी शिक्षण मंडळ संचालित सरस्वती विद्यामंदिर,केळसेकर इंग्लिश मीडियम स्कूल तळोजा पाचनंद, अर्कम इंग्लिश स्कूल तळोजा, ओझन्स इंटरनॅशनल स्कूल कोळखे,प्लीजन्ट इंग्लिश स्कूल सांगडे,एस.बी.पी इंग्लिश स्कूल शेडूंग,पायोनियर पब्लिक स्कूल पारगाव, लिटल चॅम्प ओवळे, एकलव्य स्कूल ओवळे, वेदिक ट्री. प्री. स्कूल करंजाडे, वेद ड्राप पब्लिक स्कूल, सेक्टर ३ करंजाडे, डॉल्फिन किड्स स्कूल, के.डी.शेल्टर, करंजाडे, ओसीन ब्राईट कॉन्हेंट स्कूल तळोजा, वेदांत पब्लिक स्कूल कळंबोली, ऑक्सफोर्ड इंग्लिश स्कूल कळंबोली, सेंट अन्योनी इंग्लिश स्कूल करंजाडे,एसजीटी इंटरनॅशनल स्कूल करंजाडे, वेद गृह इंटरनॅशनल स्कूल करंजाडे या शाळा शासनाच्या परवानगी न घेता सुरू असल्याचे जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक पुनीता गुरव यांनी जाहिर केले आहे.
शाळांची यादी जाहिर झाल्यामुळे शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांची चिंता वाढली आहे. पालकांनी शाळेत जावून चौकशी सुरू केली आहे. यावर बेकायदा शाळा चालकांनी तुमच्या विद्यार्थ्याला आम्ही इतर मान्यता प्राप्त शाळांचा दाखला देवू असे सांगितले जात आहे. शिक्षण विभागाकडे याची चौकशी केली असता शाळा प्रवेश एका शाळेत,आणि शिक्षण दुसऱ्या शाळेत या प्रकाराला दुजोरा दिलेला आहे.बोगस शाळा मान्यताप्राप्त शाळांशी हातमिळवणी करून विद्यार्थ्यांचे प्रवेश दुसऱ्या शाळेत दाखवतात आणि वर्ग मात्र स्वतःच्या मान्यता नसलेल्या बेकायदा शाळांमध्ये सुरू करतात, असे प्रकार पनवेलमध्ये सुरू असून २३ शाळांची चौकशी सुरू आहे अशी माहिती देण्यात आली. विशेष म्हणजे महिनाभरापुर्वी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी शाळेत प्रवेशाच्या बहाण्याने चौकशी करंजाडेतील एका शाळेचे बोगस प्रकरण समोर आणले होते.
बोगस शाळांमध्ये सध्या प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पुर्नवसन करण्यासाठी प्रयत्न करू परंतू पालकांनी नव्याने या शाळांमध्ये प्रवेश घेवू नयेत.पालकांनी प्रवेश घेण्यापुर्वी शाळेच्या मान्यतेबाबत चौकशी करावी, शंका असल्यास पनवेल पंचायतीशी संपर्क साधावा.
एस. आर. मोहिते,
गटशिक्षणधिकारी पनवेल
Post a Comment