वादग्रस्त,धार्मिक तेढ निर्माण करणारी पोस्ट आपला पाल्य करत तर नाही ना? पालकांनी आपल्या मुलांचे मोबाईल तपासा : कळंबोली पोलिसांचे आवाहन
कळंबोली ( दीपक घोसाळकर ) : सोशल मीडियामध्ये वादग्रस्त व धार्मिक तेढ निर्माण करणारी पोस्ट व्हायरल झाल्याने सामाजिक तणाव निर्माण होऊन दंगल सदृश्य घटना राज्यात घडत आहेत. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर करीत असताना पालकांनी आपल्या पाल्याच्या मोबाईल वापरावर लक्ष केंद्रित करून वादग्रस्त पोस्ट किंवा धार्मिक तेढ निर्माण करणारी पोस्ट आपला पाल्य करत तर नाही ना? यासाठी पालकांनी आपल्या मुलांचे मोबाईल चेक करून धार्मिक सलोखा राखण्याचे आवाहन कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप गुजर यांनी सोशल मीडियाद्वारे नागरिकांना केले आहे.
सोशल मीडियासारखे अतिवेगवान प्रसारणाचे काम करण्याचे हत्यार म्हणून वापरले जात आहे. मात्र या सोशल मीडियातून धार्मिक तेढ निर्माण करणारी किंवा दोन धर्मांमध्ये सलोख्याला तडा जाणाऱ्या वादग्रस्त पोस्ट करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे .त्यामुळे जातीय व धार्मिक शांततेला तडा जाऊन राज्यात दंगल सदृश्य स्थिती काही वेळा निर्माण होऊ शकते .या करता सोशल मीडिया वापरणाऱ्या सर्वांनीच जर एखादी धार्मिक तेढ निर्माण करणारी पोस्ट व्हायरल होत असेल तर ती अन्य कोणालाही न पाठवता त्याबाबत कळंबोली पोलीस ठाण्यात संपर्क साधून त्याबाबत तक्रार दाखल करावी तसेच समाजात शांतता ,जातीय सलोखा, धार्मिक स्नेहबंध वाढावा यासाठी प्रत्येक नागरिकांनी राष्ट्रीय कर्तव्य म्हणून काम करावे व आपल्या सोशल मीडियावरचा वापर करताना काळजी घ्यावी.
दोन धर्मात कोणत्याही प्रकारची तेढ निर्माण होईल अशा वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करू नये. यासाठी प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांचे मोबाईल वारंवार तपासावे किंवा त्यांच्याशी बातचीत करून याबाबत त्यांना समजावून सांगावे .वादग्रस्त ठरणाऱ्या व जातीय तणाव निर्माण करणाऱ्या सोशल मीडियावर फोटो अगर मजकूर कोणीही व्हायरल करू नये. यासाठी प्रत्येक पालकांनी काळजी घ्यावयाची आहे. जर अशा पद्धतीने सोशल मीडिया किंवा एखाद्या ग्रुपचा ॲडमिन किंवा फेसबुक ,ट्विटर, इंस्टाग्राम वर वादग्रस्त मजकूर किंवा फोटो व्हायरल करून सामाजिक अशांतता निर्माण करत असेल तर त्याची माहिती कळंबोली पोलिसांना तातडीने देऊन शासन व समाजाला सहकार्य करण्याचे आवाहन कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप गुजर यांनी सोशल मीडियाद्वारे कळंबोलीतील नागरिकांना आवाहन केले आहे.
Post a Comment