आगामी निवडणुकांसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सज्ज व्हा -माजी आमदार हुस्नबानू खलिफे : पनवेल काँग्रेसची आढावा बैठक
पनवेल:आगामी निवडणुकांसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सज्ज व्हा असे आवाहन काँग्रेसच्या प्रदेश निरीक्षक माजी आमदार हुस्नबानू खलिफे यांनी पनवेल शहर जिल्हा काँग्रेसच्या आढावा बैठकीत केले.
प्रभागनिहाय मंडल समिती स्थापन करणे, बूथ कमिट्या स्थापन करणे तसेच आगामी महापालिका,पंचायत समिती, जिल्हा परिषद,विधानसभा, लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षसंघटना मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून पनवेल शहरातील काँग्रेसभवन येथे आयोजित आढावा बैठकीत संघटनात्मक चर्चा करण्यात आली.
यावेळी माजी आमदार हुस्नबानू खलिफे यांनी मार्गदर्शन केले. कार्यकर्त्यांनी विविध नागरी समस्या हाताळाव्या. पक्षात महिला संघटना सक्षम करणे आवश्यक असून आगामी निवडणुकांसाठी सज्ज व्हा, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पनवेल काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील म्हणाले, देशात जातीय तेढ निर्माण करण्याचे व धर्माधर्मांमध्ये भांडणे लावण्याचे दुष्कृत्य सुरू आहे.या अनुषंगाने काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी सजग राहावे.त्याचबरोबर सोशल मीडियावर पक्षाच्या विरोधात अपप्रचार करण्यात येतो. सामाजिक तेढ निर्माण करणारे खोटे व्हिडिओज, पोस्ट शेअर केल्या जातात.त्यामुळे त्यामागील वास्तव व सत्यता जनतेसमोर आणून अपप्रचार करणाऱ्यांचा बुरखा फाडण्याची आवश्यकता आहे.त्याचबरोबर पनवेलमधील कचरा, प्रदूषण, पाणी, मालमत्ता कर, रस्ते, वीज आदी समस्या जटील झाल्या आहेत. त्यामुळे विविध नागरी समस्यांच्या विषयांमध्ये लक्ष घालून त्याबाबत उपाययोजना करण्यासाठी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडणे गरजेचे आहे. यासाठी कार्यकर्त्यांनी झोकून काम करा. जोपर्यंत महाराष्ट्रात महाविकास आघाडी आहे,तोपर्यंत पनवेल-उरणमध्ये देखील महाविकास आघाडीची एकजूट अबाधित राहील, असा विश्वासही सुदाम पाटील यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी काँग्रेसच्या प्रदेश निरीक्षक माजी आमदार हुस्नबानू खलिफे, सहनिरीक्षक दीपक शर्मा, पनवेल काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, कॅप्टन कलावत, शशिकांत बांदोडकर,आबा खेर, नंदराज मुंगाजी, वसंत काठावले, हेमराज म्हात्रे,निर्मला म्हात्रे शशिकला सिंह, सुदेशना रायते, नीलम पाटील, प्रेमा अपाच्या, कांती गंगर, सुधीर मोरे, अरुण कुंभार, सुरेश पाटील, रामचंद्र पाटील, बबन केणी, विनीत कांडपिळे,यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Post a Comment