'करमणुकीचा उत्कंठावर्धक प्रयोग’! घर बंदूक बिरयानी' ...
मुंबई - ( वेद सतीश डोंगरे ) एक रंजक, उत्कंठावर्धक गोष्ट 'निर्मिती मूल्यांमध्ये तडजोड न करता, प्रेक्षकांसमोर आणण्यात 'घर बंदूक बिरयानी' मराठी चित्रपट यशस्वी ठरतोय.
नागराज मंजुळे हे नाव सिनेसृष्टीतल्या प्रयोगशील चित्रपटकर्त्यांमध्ये गणलं जातं. वेगवेगळे विषय ताकदीने हाताळण्याचं त्याचं कौशल्य विलक्षण म्हणावं लागेल. हेमंत अवताडे दिग्दर्शित 'घर बंदूक बिरयानी' या चित्रपटातही त्याचा प्रत्यय येतो. या चित्रपटासाठी नागराज मंजुळे क्रिएटिव्ह दिग्दर्शकाच्या खुर्चीत बसलेले पहायला मिळतात.
प्रामुख्याने, 'कोलवाड' या नक्षलवाद्यांच्या प्रभावाखाली असणाऱ्या परिसरात ही कथा 'पल्लम', 'राया पाटील' आणि 'राजू' या तीन प्रमुख पात्रांभोवती गुंफली आहे. पल्लम या जंगलातील डाकू कॅम्पच्या कमांडरने स्थानिक आमदार आणि सरकारी व्यवस्थेविरुद्ध, आपल्या टोळीच्या साथीने सशस्त्र मिशन पुकारलेलं असतं. दुसऱ्या बाजूला पुण्यातील प्रामाणिक पोलीस अधिकारी राया पाटील याला, एका राजकारण्याविरोधात कारवाई केल्याबद्दल थेट कोलवाडच्या नक्षलवादी परिसरात बदली करून पाठवलं जातं. तिसरा राजू हा कोलवाडजवळच्या एका ढाब्यावर आचारी असून, अतिशय चविष्ट बिर्याणी बनवत असतो. त्यातच पल्लमची प्रेयसी मारिया पोलीस चकमकीत मारली गेल्यामुळे, पल्लम आपलं मिशन आणखी आक्रमकपणे पुढे नेतो. पुढे हे तिघेही आमनेसामने येऊन जे घडतं, ते प्रत्यक्ष पडद्यावर पाहणं फारच उत्कंठावर्धक आहे.
पल्लम या राग, चीड, भीती, प्रेम, करुणा, विनोद अशा अनेकरंगी छटा सामावलेल्या डाकू कमांडरच्या भूमिकेत सयाजी शिंदे भाव खाऊन जातात. राया पाटील ही 'सिंघम स्टाईल' डॅशिंग पोलीस अधिकाऱ्याची भूमिका नागराज मंजुळे यांनी अफलातून रंगवली आहे. आकाश ठोसर ‘सैराट’मधल्या 'परशा'च्या प्रतिमेतून बाहेर पडत, 'राजू' या वेगळ्या धाटणीच्या भूमिकेला कोऱ्या पाटीने सामोरा गेलाय. सायली पाटील ( लक्ष्मी ), दीप्ती देवी ( राया पाटीलची पत्नी ) आणि श्वेतांबरी घुटे ( मारिया ) यांचा सहज अभिनय रंगत वाढवतो. सोबतच विठ्ठल काळे, प्रवीण डाळिंबकर, गणेश देशमुख अशा अनेक कलावंतांनी स्वतःची छाप पाडली आहे.
चित्रपटाची कथा व संवाद यावर हेमंत अवताडे आणि नागराज मंजुळे यांनी संयुक्तपणे काम केलंय. एक मुख्य कथा केंद्रस्थानी घेऊन, तिलाही तीन उपकथा बांधलेल्या आहेत. कथेत बेमालूमपणे पेरलेला 'ब्लॅक ह्युमर’ खळखळून हसवतो. तर कधी हळुवार भावनिक प्रसंगांनी मन अस्वस्थ होतं. 'घर बंदूक बिरयानी' हे चित्रपटाचं शीर्षक कथेशी पूर्णतः समर्पक आहे. तीन प्रमुख पात्रांचा संबंध 'घर बंदूक आणि बिर्याणी'शी कसा जोडला गेलाय, हे चित्रपटात पाहणं रंजक ठरतं.
नक्षलवादसदृश जंगलात चित्रीकरण, मोठ्या प्रमाणात गोळीबाराचे प्रसंग असा मोठा आवाका असणाऱ्या चित्रपटाचं दिग्दर्शन सांभाळणं, यातून हेमंत अवताडे यांचं दिग्दर्शकीय कौशल्य ठळकपणे जाणवतं. प्रत्येक पात्राचं वेगळेपण त्याच्या हावभाव आणि देहबोलीतून अधोरेखित करण्यात क्रिएटिव्ह दिग्दर्शक म्हणून नागराजने छाप पाडली आहे.
ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांचं संगीत आणि सोबतच पार्श्वसंगीत चित्रपटाला उंचीवर नेऊन ठेवतं. यातलं प्रत्येक गाणं वेगळ्या पद्धतीचं आणि सुश्राव्य बनलंय. आत्तापर्यंत, नागराजच्या चित्रपटातलं संगीत प्रामुख्याने ग्रामीण बाज किंवा मेलडी स्वरूपाचं राहिलंय. मात्र या चित्रपटात याला छेद देत, उडत्या चालीचं आणि त्यातही आधुनिक प्रवाहाशी नातं सांगणारं संगीत ऐकायला मिळतं. वैभव देशमुख यांचं गीतलेखन समर्पक ठरलंय.
जंगलातले प्रसंग, वरच्या अँगलने टिपलेले शॉट्स, पल्लमची गँग आणि पोलीस यांच्यामधली चकमक, गोळीबार अशी साहस दृश्ये विक्रम अमलादी यांच्या 'सिनेमॅटोग्राफी'ने नेत्रदीपक बनली आहेत.
नागराजचा चित्रपट म्हंटल्यावर काही ठरलेल्या गोष्टी डोळ्यांसमोर उभ्या राहतात. मात्र यात त्याच्या नेहमीच्या चौकटीबाहेर पडत, नागराज आणि टीमने नवनव्या गोष्टी प्रथमच घडवून आणल्या आहेत. त्याच्या नेहमीच्या 'सामाजिक आशयाच्या परिघा'बाहेर जाऊन, नागराजने निखळ 'मनोरंजक सफर' घडवणारी कलाकृती प्रेक्षकांसमोर सादर केली आहे. स्वतःच्या चित्रपटात कायम कमी रुंदीच्या लहान भूमिकांमध्ये दिसणारा नागराज, यात प्रमुख भूमिकेत झळकलाय. त्यातही त्याच्या आशयघन आणि प्रेक्षकांच्या भावनांना हळुवारपणे साद घालणाऱ्या फॉर्म्युल्याची जागा, यात 'ॲक्शन मोड'ने घेतली आहे. सामाजिक विषय संवेदनशीलपणे हाताळणारा नागराज, या चित्रपटात 'ॲक्शन हिरो’च्या धमाकेदार रुपात समोर आलाय. नागराजच्या प्रत्येक कलाकृतीमध्ये अजय-अतुल संगीताची धुरा सांभाळत असतात. परंतु यावेळी ए. व्ही. प्रफुल्लचंद्र या भन्नाट संगीतकाराने ही जबाबदारी व्यवस्थित पार पाडली आहे.
चित्रपट पाहताना काही त्रुटी निश्चित जाणवतात. चित्रपटाची पावणे तीन तासांची लांबी थोडी खटकते. पल्लमचा व्यवस्थेवरचा राग आणि असंतोष यामागची पार्श्वभूमी हवी तशी स्पष्ट केलेली नाही. काही प्रसंगांचा तर्काच्या पातळीवर विचार करताना, ते तर्कापासून दूर गेलेले वाटतात. मात्र, हिंदी किंवा दक्षिणेतले चित्रपट जसं डोकं बाजूला ठेवून निखळ आनंदाने पाहिले जातात, तसंच या चित्रपटाकडेही 'करमणुकीचा रंजक प्रयोग' म्हणून नक्कीच पाहता येईल.
प्रेक्षकांची अभिरुची अग्रभागी ठेवून कलावंतांची दमदार फळी, खुमासदार संवाद, खिळवून ठेवणारी गोष्ट, तिला प्रेमकथेची किनार, विलक्षण ताकदीचं संगीत, ॲक्शन, थरार, विनोद असे चित्रपटाचे विविध जिन्नस एकत्र करुन एक दर्जेदार आणि चविष्ट बिर्याणी तयार झाली आहे. कथेच्या गरजेनुसार निवडलेली 'लोकेशन्स', तयार केलेली 'वातावरण निर्मिती' आणि 'सिनेमॅटोग्राफीतलं चातुर्य' या घटकांद्वारे चित्रपटाला लाभलेली 'भव्यता', हिंदी किंवा दाक्षिणात्य चित्रपटांसोबतच 'मराठी'तही अनुभवता येऊ शकते, हे या चित्रपटाने सप्रमाण सिद्ध केलंय. त्यामुळेच, एक रंजक, उत्कंठावर्धक गोष्ट 'निर्मिती मूल्यां'मध्ये तडजोड न करता, प्रेक्षकांसमोर आणण्यात 'घर बंदूक बिरयानी' यशस्वी ठरलाय. मराठी सिनेसृष्टीतला एक वेगळा प्रयोग म्हणून, आवर्जून आस्वाद घ्यावा अशी ही कलाकृती म्हणता येईल.
Post a Comment