नवाब मलिकची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा- भाजपाचे आ.प्रशांत ठाकूर यांची मागणी
पनवेल- नवाब मलिक यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून महाराष्ट्र वाचवावा अशी जोरदार मागणी भाजपचे आ.प्रशांत ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत केली.
जर यासंदर्भात कारवाई झाली नाही तर येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाला अधिक आक्रमक व्हावे लागेल असा इशाराही आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी पत्रकार परिषदेमध्ये दिला.
यापुढे बोलताना आ. प्रशांत ठाकूर यांनी, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता म्हणून मिरविणाऱ्या नवाब मलिक याचा खरा चेहरा आता ईडीच्या कारवाईनंतर समोर येऊ लागला असून तपासानंतर आणखीही अनेक कारवाया उजेडात येण्याची शक्यता आहे.
असे असतानाही, नवाब मलिक याचे मंत्रिपद वाचविण्यासाठी खुद्द शरद पवारच ठाकरे सरकारवर दबाव आणत असून मुख्यमंत्रीपद वाचविण्यासाठी उद्धव ठाकरे या दबावापुढे झुकून संरक्षण देत आहेत,असा आरोप आ.प्रशांत ठाकूर यांनी या पत्रकार परिषदेत केला.
महाराष्ट्राच्या आणि देशाच्या सुरक्षिततेस धोका ठरणाऱ्या नवाब मलिकची केवळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी करणे पुरेसे नाही, तर या कामी ईडीकडून केल्या जाणाऱ्या तपासातही ठाकरे सरकारने संपूर्ण सहकार्य केले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. नवाब मलिक यास वाचविण्याकरिता आणि सत्ता टिकविण्याकरिता आपण महाराष्ट्राचा अपमान करत आहेत.
आघाडी सरकारच्या या लाळघोटेपणामुळेच महाराष्ट्राची नामुष्की होत असून, मुख्यमंत्री ठाकरे यांच्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्र कणाहीन नाही, हे दाखविण्यासाठी भाजपतर्फे तीव्र आंदोलन पुकारले गेले आहे. नवाब मलिक यांची हकालपट्टी आणि कठोर कारवाई करून दहशतवादास हातभार लावणाऱ्या देशद्रोह्याच्या पाठीराख्यांची महाराष्ट्र गय करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. दाऊदच्या गुलामाचे गुलाम होण्याएवजी जनतेच्या मनातील नवाब व्हा, असा उपरोधिक सल्लाही आ.प्रशांत ठाकूर यांनी ठाकरे सरकारला दिला.
Post a Comment