पनवेलमध्ये मालमत्ता कर आता ‘PMC TAX APP’ ॲपद्वारेही भरता येणार ...
पनवेल : पनवेल महानगरपालिकेमार्फत मालमत्ता धारकांना ई सुविधा देण्याकरिता तसेच नागरिकांच्या वेळेची बचत व्हावी , घरबसल्या आपल्या मालमत्ता करासंबंधित तसेच नोंदणीकृत मालमत्तेबाबत संपूर्ण माहिती देण्याच्या हेतुने ‘ मनपा आपल्या दारी’ या अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत ‘PMC TAX APP’ मोबाईल ॲपचे उद्घाटन आयुक्त श्री. गणेश देशमुख यांच्या हस्ते पालिका मुख्यालयात करण्यात आले.
या ॲपच्या माध्यमातून ई गव्हर्नन्सच्यादृष्टीने पालिकेने महत्वाचे पाऊल टाकले आहे. या ॲपच्या माध्यमातून सध्या मालमत्ता कर तसेच पुढच्या काहि दिवसात पाणी बिलही भरता येणार आहे.
मालमत्ता कराचा भरणा, मालमत्ता कर आकारणी तसेच नावातील फेरफाराबाबत किंवा इतर कोणत्याही तक्रारी बाबत आक्षेप अर्ज करणे, त्यांचे निराकरण करणे तसेच कराची पावती अथवा मालमत्तेचा उतारा दाखला, यासाठी मालमत्ता धारकांना महानगरपालिकेत ये-जा करावी लागत होती. मालमत्ता धारकांनी केलेल्या आक्षेपावरती अथवा आवश्यक असलेल्या तक्रारीसाठी मालमत्ता करविभागाद्वारा काही प्रमाणात सेवा देण्याकरिता विलंब पण होत होता. सदर विलंब टाळण्याकरिता व प्रत्यक्ष करदात्यांनाच मालमत्ता कर विभागामध्ये ये-जा करावी लागू नये म्हणून घरबसल्या आपल्या मालमत्ता करा संबंधित तसेच नोंदणीकृत मालमत्तेबाबत संपूर्ण माहिती आता महानगरपालिका द्वारा ‘मनपा आपल्या दारी’ या अभिनव उपक्रमाद्वारे मोबाईल ॲप नागरिकांच्या सेवेत देण्यात येतआहे.
गुगल प्ले स्टोअरमधून हे ॲप मालमत्ताधारकांना आपल्या मोबाईलमध्ये घेता येणे सहज शक्य् आहे. ई गव्हरर्नन्सच्या माध्यामातून सुरू करण्यात आलेल्या या अॅपद्वारा संपुर्ण महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्ता धारकांना आपआपल्या मालमत्ता संबंधित मालमत्ता कराचा भरणा तसेच उतारे तक्रारी फेरबदल इत्यादी कुठलेही कामाकरिता यानंतर महानगरपालिकेत ये-जा करण्याची तसेच आपले काम झाले की नाही हे बघण्याची आवश्यकता पडणार नाही.
याआधी प्रत्यक्ष कर भरणाच्या मालमत्ता धारकांनाच या सर्व कामांकरिता महानगरपालिकेत लेखी अर्ज दाखल करावा लागत होता. कर भरण्याकरिता मोठ्या रांगेत उभे राहून कराचा भरणा करून इतर दाखले करण्याकरिता देखील अर्ज करून कित्येक दिवस त्यांच्या कामाकरिता प्रतिक्षा करावी लागत होती. मात्र आता या ॲपच्या माध्यमातून मालमत्ता धारकांना आपल्या मालमत्ता करा संबंधित सगळ्या बाबी आपल्या घरी बसूनच उपलब्ध होणार आहे. ॲपच्या माध्यमातून मालमत्ता धारकांना एसएमएसच्या माध्यमातून मालमत्ता कराची बिले तसेच अंतिम तारखेचे नोटिफिकेशनदेखील येणार आहे.
तसेच हे ॲप मराठी व इंग्रजी दोन्ही भाषेत उपलब्ध करून देण्यात आले आहे. ‘PMC TAX APP’ डाऊनलोड करताना सुरूवातीस साईन अप करावे लागेल ज्यामध्ये मालमत्ता धारकाचा मोबाईल नंबर व एक पासवर्ड देण्यात येईल जो प्रत्येकवेळी त्यास ‘साईन इन’ करताना द्यावा लागेल.
पुढे ॲपमध्ये मालमत्ता धारकांना त्यांचा मालमत्ता कर दिसेल, तसेच नागरिकांची मालमत्ता, त्यांची पेमेंट पासबुक , नोंदणीकृत मालमत्ता कळू शकणार आहे. ॲपमध्ये पुढे ऑनलाईन पध्दतीने मालमत्ता कर भरण्यासाठी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, युपीआय, भीम युपीआय, क्यु आर कोड असे विविध पर्याय दिसू शकतील. तसेच ज्यांना ई बिल हवे आहे. त्यांना ई बिल सेवा देण्याची सोयही या ॲपमध्ये करण्यात आली आहे.


Post a Comment