समानता असलेली लोकशाही इथे नांदेल ....
समानता असलेली लोकशाही इथे नांदेल ....
(अँड.विशाखा बोरकर)
पनवेल - प्रजासत्ताक दिनाला काही क्षणासाठी का असेना कुठे कुठे केवळ आभासी राष्ट्रभक्तीची झगमगाट दिसेल,प्रत्येक स्टेटसला, प्रत्येक प्रोफाईलला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिसतील.
कारण २६ जानेवारी म्हटला की, आमचा प्रजासत्ताक दिवस राष्ट्रीय सण असतो बरं का! खूप आनंदाचा पण ती देशभक्ती आमची त्या त्या दिवसापूरतीच रहावी.
आम्ही एकमेकांना शुभेच्छा देत जातो अन संपतो अवघा दिवसच! छान गेला शुभेच्छा देत-देत आपला प्रजासत्ताक दिन म्हणून आनंद व्यक्त करतो आणि केवळ शुभेच्छा देण्यात फोटो काढण्यात वेळ घालवतो.पाहिले तर तिथेच आपले राष्ट्रीय कर्तव्य अधांतरी ठेवतो .
दुसऱ्या दिवशी मात्र सर्वजण आपापल्या कामाने लागतात,पुन्हा स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिनाची वाट पाहत.ज्या महामानवांनी आपल्याला ही सुवर्ण दिवस आयुष्यामध्ये आणण्यासाठी अवघे आयुष्य झटले त्यांच्या स्वप्नातील देश मात्र आम्हाला पुन्हा नव्याने उभे करण्याचे भानच राहिले नाही मुळात!
आम्हाला दिसतील ही कसे ती अनेक प्रश्न! आम्ही तर केवळ आमच्याच विश्वात अगदी मग्न होऊन गेलो आहोत.
आम्हाला दोन वेळचं जेवण मिळतं, आम्हाला हवे तेव्हा कपडे मिळतात,आम्हाला हव्या त्या गोष्टी वेळेवर उपलब्ध होतात,पण त्याही पलीकडे आम्हाला त्या रस्त्यावर उभ्या असणाऱ्या गरीब,उपाशी,थंडीने गारठलेल्या लोकांकडे पाहून त्यांच्या आयुष्याबद्दल जाणून घेण्याची गरजच नाही वाटत कधी!
आम्ही प्रजासत्ताक दिवस,स्वातंत्र्य दिवस साजरा तर करतो; पण आपल्या देशामध्ये असलेले भेदभाव जातिभेद,वंशभेद,रंगभेद,नको त्या रुढी-परंपरा याच्यावर बोलण्याचे आम्हाला त्या त्या दिवशी खरच गरज नाही का वाटत?
बरे कितीही चांगल्या वाटणा-या गोष्टी दिसल्या आपल्याला तरी कितीतरी समस्यांनी आतून पोखरत चाललाय आपला देश. उद्याचा प्रजासत्ताक दिवस येईल आणि जाईल पण तो शेतकरी जो रात्रंदिवस आपल्या शेतामध्ये खूप- खूप राबराब राबतो त्याचे दिवस कधी बदलतील?आजच्या युवा पिढीच्या बेरोजगारीचे प्रश्न कसे सुटतील ?प्रत्येक क्षणाला बलात्काराला बळी जाणार्या पीडिता यांचा जीव कधी वाचेल?रस्त्यावर आपल्या पोटभर जेवणासाठी हात पसरणारे लहान चिमुकले हात कधी थांबतील?
खूप - खूप प्रश्न आहेत,समस्या आहेत ज्या प्रत्येकाला माहीत आहे,पण यावर बोलायला सध्या कोणी तयार नाही!कारण प्रत्येकाला केवळ स्वतःच्या पलीकडे जायलाच वेळ नाही हीच मुळात शोकांतिका. मला नेहमी वाटत प्रजासत्ताक दिवस साजरा करीत असताना आपल्या देशातील कोणत्याही कोपऱ्यामध्ये कोणतेही निरागस बाळ उपाशी नसेल, कुठल्याही व्यक्तीला जातिभेदाने मारल्या जाणार नाही, बेरोजगारीने कोणताही युवक आत्महत्या नाही करेल,प्रत्येक क्षणाला प्रत्येक मुलगी, महिला सुरक्षित असेल,वंशभेद, जातीभेद रूढी परंपरा या सर्व भेदभावाला नाहीसे करुन केवळ मानवतेचे तेथे वारे वाहिल्या जातील.
येथे स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्यायावर उभी असलेली खरी समानता असलेली लोकशाही इथे नांदेल.कोणत्याही व्यक्ती वा समूहाच्या मूलभूत हक्काची पायामल्ली येथे होणार नाही, प्रत्येकाला आपल्या संविधानिक कर्तव्याची जाणीव असेल.ही सर्व वाटणारी परिस्थिती कधी निर्माण होईल हाच मोठा प्रश्न!
केवळ शुभेच्छा न देता आपल्याला आपल्या देशातीच्या प्रगतीच्या आड येणा-या अडचणी, समस्या यावर ही बोलले पाहिजे.त्या सोडवण्यासाठी एकत्र येऊन लढले पाहिजे.प्रजासत्ताक दिनाला आपल्या हातात तिरंगा घ्यायला पैसे असतील पण बाजुला उभ्या उपाशी लहानमुलाकडे पाहुन तुम्हाला त्याची भुक दिसत नसेल तर काहीच अर्थ नाही, त्या मुलासाठी त्या सणाचा,कारण तो कालही उपाशी होता आजही आहे,आणि उद्याच्या भाकरीची चिंता मनात आहे त्या चिमुकल्याच्या,मग काय तर आपण प्रजासत्ताक दिवस साजरा करीत आहोत.या सर्व प्रश्नांवर प्रत्येक भारतीय व्यक्तीने विचार करायला हवा इतकेच!
✍अँड.विशाखा समाधान बोरकर
Post a Comment