दिबांचे नाव लागल्याशिवाय विमान उडणार नाही .... प्रकल्पग्रस्तांचे २४ जानेवारीला विमानतळ काम बंद लाक्षणिक आंदोलन ....
प्रकल्पग्रस्तांचे २४ जानेवारीला विमानतळ काम बंद लाक्षणिक आंदोलन ....
पनवेल - २४ जानेवारीला पनवेल जवळील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम बंद पाडण्यात येणार आहे.
लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती, २७ गाव प्रकल्पबाधित कृती समिती व इतर संघटनांनी हा काम बंदचा एल्गार पुकारला आहे.
प्रकल्पग्रस्तांच्या बाबतीत कायम उदासीन राहिलेल्या सिडकोच्या विरोधात २४ जानेवारीला विमानतळाचे काम बंद आंदोलन करून सिडकोला जोरदार दणका देण्यात येणार आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे दैवत लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी स्थानिक प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र एकवटला आहे. यापूर्वी आंदोलने करत भूमिपुत्रांची ताकद सिडको आणि शासनाला दाखविण्यात आली आहे. नुकताच झालेल्या भूमिपुत्र निर्धार परिषदेत दिबांचे नाव लागल्याशिवाय विमान उडणार नाही, आणि त्यासाठी काहीही करावे लागले तरी चालेल असा एल्गार पुकारण्यात आला. दरम्यान सिडको व शासनाने अद्यापही त्यांची मुजोरी कायम ठेवली आहे, त्यामुळे २४ जानेवारीला विमानतळ काम बंद आंदोलन जोरदारपणे करण्यात येणार आहे.
पनवेल तालुक्यात होऊ घातलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील साहेबांचे नाव द्यावे यासाठी सन २००८ पासून सिडकोकडे सातत्याने विविध संघटना,संस्था व प्रकल्पग्रस्तांची सातत्याने मागणी आहे. मागील वर्षी १० जून साखळी आंदोलन, २४ जूनला लाखो भूमिपुत्रांच्या उपस्थितीत सिडको घेराव आंदोलन, ०९ ऑगस्ट क्रांती दिनी गावागावात मशाल मोर्चा झाला. तर १३ जानेवारी २०२२ रोजी भूमिपुत्र निर्धार परिषद अशी लक्षवेधी ऐतिहासिक आंदोलने झाली.
दुसरीकडे सिडकोने या सार्वत्रिक मागणीकडे दुर्लक्ष करीत याविषयी गुपचूप केलेला ठराव विखंडित करण्याचा निर्णय आजवर घेतलेला नाही.
या पार्श्वभूमीवर १३ जानेवारी रोजी झालेल्या भूमिपुत्र निर्धार परिषदेत विमानतळ बाधित २७ गावांच्या प्रलंबित समस्या सोडवण्या विषयी सिडकोस अल्टिमेटमही देण्यात आला होता.याकरिता पोलीस अधिकाऱ्यांच्या पुढाकाराने २० जानेवारीस सिडको प्रशासनाबरोबर २७ गाव विमानतळ बाधित प्रतिनिधी आणि विमानतळ नामकरण कृती समिती प्रतिनिधी यांची सिडको भवनात बैठक घेण्यात आली.
मात्र सिडको प्रशासन थातूरमातूर उत्तरे देत आपली नैतिक जबाबदारी टाळत असल्याचे बैठकीत स्पष्ट दिसून आले. त्यामुळे विमानतळाचे काम बंद पडल्या शिवाय सिडको वठणीवर येणार नाही, त्यामुळे २४ जानेवारीला विमानतळाचे काम बंद पाडण्याचे सर्वानुमते घोषित करण्यात आले आहे. कोविडचा प्रोटोकॉल पाळून सिडकोच्या मुजोरी विरोधातील या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Post a Comment