जमिनी आमच्या .. नैनाच्या अधिकाऱ्यांना गावबंदी करा... नैना विरोधात पनवेलमध्ये शेतकरी एकवटले
नैनाच्या अधिकाऱ्यांना गावबंदी करा...
नैना विरोधात पनवेलमध्ये शेतकरी एकवटले
पनवेल - फुकटचा सावकारीचा धंदा करणाऱ्या सिडकोचा नैना प्रकल्प शेतकऱ्यांवर अन्याय करणारा असून नैना प्रकल्प रद्द झाल्याशिवाय आता माघार नाही असा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे नेते आ.जयंत पाटील यांनी पनवेलमध्ये दिला.
नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समिती पनवेल यांच्यावतीने पनवेलजवळील स्वप्ननगरी येथे शेतकऱ्यांचा भव्य मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, आमदार बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे, पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, काँग्रेसचे जी.आर .पाटील, नगरसेवक गणेश कडू, प्रज्योती म्हात्रे ,माजी नगराध्यक्षा अनुराधा ठोकळ, नगरसेवक गोपाळ भगत,रायगड जिल्हा परिषद सदस्य विलास फडके ,पंचायत समिती सदस्य स्वप्निल भुजंग , नैना प्रकल्पबाधित शेतकरी उत्कर्ष समितीचे अध्यक्ष वामन शेळके त्याचप्रमाणे समितीचे सल्लागार नामदेवशेठ फडके ,पनवेल पंचायत समितीचे माजी उपसभापती राजेश केणी ,सरपंच अनिल ढवळे, कामगार नेते प्रकाश म्हात्रे आदी उपस्थित होते.
यापुढे बोलताना आमदार जयंत पाटील म्हणाले , मैना पेक्षा नैना वाईट आहे . हा प्रकल्प शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आहे.नैना प्रकल्पातून शेतकऱ्यांचे अधिकार काढून घेतले जात आहेत. आपल्या जमिनी आहेत.आपली जागा आपल्या मालकीची आहे,त्यावर दहा पिढ्यांचा अधिकार आहे यासाठी आता व्यापक लढा लढावा लागणार आहे .गावोगावी बैठका घेऊन नैना हटाव या भूमिकेतून प्रभावी काम करायचे आहे. गावा-गावांमध्ये येणाऱ्या नैनाच्या अधिकाऱ्यांना गाव बंदी करावी, गावाच्या वेशीवर प्रवेश बंदीचे फलक लावावेत असे सांगून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी भारतातील सर्व शेतकरी नेते यांना या आंदोलनात सहभागी करून घ्यावे असे आवाहन जयंत पाटील यांनी केले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी,नैना हा विषय गंभीर आहे. राज्यकर्ते लँड माफिया झाले आहेत. शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करत आहेत. कचऱ्याच्या भावात घ्यायच्या ही पद्धत सर्वपक्षीय राज्यकर्त्यांमध्ये झाली आहे,त्यामुळे असंघटित शेतकऱ्यांचे शोषण होते त्याविरुद्ध लढा उभारला पाहिजे. विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी घ्यायच्या पण त्या जमिनी घेत असताना जर 90% शेतकऱ्यांचा विरोध झाला तर तो प्रकल्प रद्द केला पाहिजे असे सांगून काळी आईच्या हक्कासाठी आता आपल्याला लढा लढावा लागेल त्यासाठी काही करायची तयारी आपण शेतकऱ्यांनी ठेवली पाहिजे. आतापर्यंत केलेली आंदोलने यातून यश मिळवले असल्याचे सांगत रायगड जिल्ह्याला लढ्याचा इतिहास आहे हे आंदोलन आपण यशस्वी करू असे त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार बाळाराम पाटील यांनी आपल्या भाषणात, आमदार जयंत पाटील आणि शेतकरी नेते राजू शेट्टी या दोन व्यक्तीमुळे या लढ्याची उंची वाढली आहे.नैनामुळे शेतकऱ्यांना कुठलाही फायदा होणार नाही. बिन पैशाची सावकारी सिडको करत आहे,या पद्धतीला शेतकऱ्यांचा विरोध असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी काँग्रेसचे जी. आर.पाटील, समितीचे सल्लागार नामदेवशेठ फडके, जिल्हा परिषद सदस्य विलास फडके आदींची भाषणे झाली .शेतकरी मेळाव्याचे प्रास्ताविक पनवेल पंचायत समितीचे माजी उपसभापती राजेश केणी यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्र भोपी यांनी केले.
Post a Comment