News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

कर्जत- पनवेल शटल रेल्वे सुरू करा : रेल्वेमंत्री यांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश

कर्जत- पनवेल शटल रेल्वे सुरू करा : रेल्वेमंत्री यांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश

कर्जत-पनवेल शटल रेल्वे सुरू करा :
रेल्वेमंत्री यांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश 
       पनवेल : कर्जत व पनवेल तालुक्याच्या ग्रामीण भागात विकासासाठी महत्वपूर्ण असलेल्या कर्जत-पनवेल रेल्वे स्थानकदरम्यान शटल रेल्वे सुरू करण्यासाठी भाजपने  पाऊल टाकले आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे आमदार निरंजन डावखरे, आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या मागणीनंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शटल सेवेसाठी सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर अडीच वर्षांपासून बंद असलेल्या नेरळ- माथेरान रेल्वे सेवा सुरू करण्याबाबत सुरक्षाविषयक पाहणीही तातडीने करण्याचे निर्देश दिले आहेत.
      कर्जत व पनवेल तालुक्यातील रेल्वे प्रश्नांसंदर्भात खासदार विनय सहस्रबुद्धे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची आज भेट घेतली. या शिष्टमंडळात आमदार निरंजन डावखरे, आमदार महेश बालदी, माथेरानचे उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, शहराध्यक्ष प्रवीण सपकाळ, उपाध्यक्ष किरण चौधरी, नगरसेवक राकेश चौधरी, संदीप कदम, संजय भोसले, कर्जत भाजपाचे पदाधिकारी किरण ठाकरे आदींचा समावेश होता.
         कर्जत-पनवेल रेल्वे मार्गावरून सध्या लांब पल्ल्याच्या गाड्या धावतात. मात्र, शटल वा लोकल सेवा नसल्यामुळे स्थानिक ग्रामस्थ व चाकरमान्यांना प्रवासात अडचणी येत होत्या. त्याचबरोबर या भागाच्या विकासालाही मर्यादा आल्या आहेत. या प्रश्नावर आमदार निरंजन डावखरे, आमदार प्रशांत पाटील आणि आमदार महेश बालदी यांनी रेल्वे मंत्रालयाकडे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यानुसार खासदार विनय सहस्रबुद्धे यांच्या विनंतीवरून रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज कर्जत व पनवेल दरम्यानच्या रेल्वे प्रश्नांबद्दल रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत कर्जत-पनवेल मार्गावर शटल सेवा सुरू करण्याबाबत पाहणी करण्याचे निर्देश रेल्वेमंत्र्यांनी दिले.
          २०१९ मधील मुसळधार पावसानंतर नेरळ-माथेरान रेल्वे वाहतूक बंद आहे. त्यामुळे माथेरानच्या पर्यटनाला फटका बसला असल्याकडे रेल्वे मंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले. त्यावेळी रेल्वेमंत्र्यांनी संबंधित मार्गाची लवकरात लवकर सुरक्षा तपासणी पूर्ण करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. भविष्यात नेरळ-माथेरान दरम्यान मालवाहतुकीची ट्रेन सुरु करणे, अमन लॉज ते माथेरान दरम्यान सध्या धावणाऱ्या तीन डब्यांच्या ट्रेनऐवजी आठ डब्यांची ट्रेन सुरु करण्याबाबत पाहणी करून तातडीने निर्णय घेण्याचे आदेशही रेल्वेमंत्री वैष्णव यांनी अधिकाऱ्यांना दिले.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment