जिल्हा परिषदेच्या डेरवली शाळेत शिक्षक दिन अन् गोपाळकाल्याची रंगत....विद्यार्थ्यांनी साकारली शिक्षकांची भूमिका; राधा-कृष्णाच्या वेशभूषेत रंगला आनंददायी शनिवार
पनवेल -: पनवेल तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा,डेरवली येथे ५ सप्टेंबर रोजी ‘आनंददायी शनिवार’ उपक्रमांतर्गत शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी शिक्षकांना शिक्षक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देत त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
या विशेष उपक्रमात इयत्ता चौथी व पाचवीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारत लहान वर्गातील विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक व मनोरंजक उपक्रम घेतले. व्यायाम, कविता, गाणी, गोष्टी, गणिती कृती आणि वाचन अशा विविध उपक्रमांमध्ये मोठ्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत लहानग्यांना शिकवण्याचा आनंद अनुभवला.
विद्यार्थ्यांनी शिक्षकाची भूमिका पार पाडल्याने त्यांच्यातील नेतृत्वगुण, आत्मविश्वास, सहकार्याची भावना आणि जबाबदारीची जाणीव विकसित होण्यास मदत झाली. ‘शिकताना शिकवणे’ या अनुभवातून विद्यार्थ्यांना शिक्षणाची नवी दिशा मिळाली.
दरम्यान,श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त शाळेत गोपाळकाल्याचेही आयोजन करण्यात आले. विद्यार्थी राधा-कृष्ण आणि गोविंदाच्या वेशभूषेत शाळेत दाखल झाले होते.पारंपरिक वेशभूषा, विविध सांस्कृतिक कृती आणि सामूहिक सहभागामुळे शाळेचा परिसर उत्साहाने भारून गेला.
शिक्षक दिन आणि गोपाळकाला या दोन्ही उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना आनंदासोबतच संस्कार, नेतृत्व आणि अनुभवाधारित शिक्षणाची पर्वणी मिळाली.आनंदातून शिक्षण आणि कृतीतून अनुभव देणारा हा ‘आनंददायी शनिवार’ विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरला.
Post a Comment