पनवेल महानगरपालिकेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘खारघर हिल महापौर मॅरेथॉन’ला पनवेलकरांसह महाराष्ट्रातून धावपटूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद ....४२ कि.मीच्या देशातील पहिल्या हिल महापौर मॅरेथॉनचे आयोजन....सुमारे ९ हजार धावपटूंचा सहभाग
पनवेल, दि. २३ : पनवेल महानगरपालिकेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘खारघर हिल महापौर मॅरेथॉन’ला पनवेलकरांसह संपूर्ण महाराष्ट्रातून धावपटूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.देशातील पूर्ण ४२ कि.मी. अंतराची पहिली हिल मॅरेथॉन म्हणून विशेष महत्त्व प्राप्त झालेल्या या स्पर्धेत सुमारे ९ हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.
पहाटे ४.३० वाजता महापौर नितीन पाटील,आमदार प्रशांत ठाकूर,मुख्य प्रवर्तक परेश ठाकूर,जिल्हाधिकारी किशन जावळे,आयपीएस अधिकारी कृष्णप्रकाश,सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख,आयुक्त मंगेश चितळे,सभागृह नेते प्रकाश बिनेदार,उपमहापौर प्रमिला पाटील,स्थायी समिती सभापती बबन मुकादम,महिला व बालकल्याण समितीच्या सभापती ममता प्रितम म्हात्रे, विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे, प्रभाग समिती ‘अ’चे सभापती रवींद्र भगत,महापालिका सदस्य,अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, उपायुक्त डॉ.वैभव विधाते, उपायुक्त स्वरूप खारगे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.आनंद गोसावी आणि सुप्रसिद्ध अभिनेता अंकुश चौधरी, राजकीय पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत झेंडा दाखवून मॅरेथॉनला सुरुवात करण्यात आली.
४२ कि.मी. पूर्ण मॅरेथॉनसह २१ कि.मी. अर्ध मॅरेथॉन, १० कि.मी. धावणे, ५ कि.मी. धावणे आणि ३ कि.मी. आनंद दौड अशा विविध प्रकारांना मान्यवरांनी झेंडा दाखवून सुरुवात केली.आजवरच्या इतिहासात आतापर्यंत अशी भव्य दिव्य मॅरेथॉन पनवेलमध्ये झाली नव्हती, या ऐतिहासिक मॅरेथॉन मुळे पुढील वर्षापासून याला जागतिक मान्यता मिळून देश-विदेशातील धावपटू आकर्षित होतील. या मॅरेथॉनमुळे पनवेल महानगरपालिकेची राष्ट्रीय व जागतिक स्तरावर एक स्वतंत्र ओळख निर्माण झाली असून, ही पनवेलकरांसाठी अभिमानाची गोष्ट ठरली आहे.
दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र मॅरेथॉन....
महापौर नितीन पाटील व सभागृह नेते प्रकाश बिनेदार यांच्या पुढाकाराने या मॅरेथॉनमध्ये दिव्यांगांसाठी स्वतंत्र मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यामुळे दिव्यांगानाही मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. सुमारे १०० दिव्यांनी बांधवांनी या विशेष मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदविला. दिव्यांग बांधवांनी या विशेष मॅरेथॉनचे आयोजन केल्याबद्दल पनवेल महापालिकेचे आभार मानले. लहान बालकांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत विविध वयोगटांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त.....
AIMS प्रमाणपत्र मिळाल्यामुळे या मॅरेथॉनला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे ९ हजार धावपटूंच्या सहभागामुळे या स्पर्धेने पनवेल महानगरपालिकेची राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र ओळख निर्माण करण्यास हातभार लावला आहे. पनवेलकरांसाठी ही निश्चितच अभिमानाची बाब ठरली आहे.
नियमित धावण्याची सवय लागावी, नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे आणि युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा संस्कृती रुजावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेली ही मॅरेथॉन क्रीडाप्रेमींसाठी पर्वणी ठरली. स्थानिक, ग्रामीण आणि निमशहरी भागातील धावपटूंना आपल्या परिसरातच राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली. यामुळे नागरिकांमध्ये उत्साह निर्माण होण्याबरोबरच पनवेल परिसरातील पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळण्यास मदत झाली.
सर्वस्तरांतून उत्स्फूर्त सहभाग.....
नवी मुंबईचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे, ,माजी आयुक्त सुधाकर देशमुख, ठाण्याचे सहायक पोलीस आयुक्त आदिनाथ बुधावर, उपजिल्हाधिकारी राहुल सूर्यवंशी, युवराज बनगर, ठाणे पोलीस उपायुक्त शैलेश काळे, उपायुक्त मनपा जयंत जावडेकर,एमएमआरडीएचे वरिष्ठ अधिकारी, विविध शासकीय आस्थापनांतील अधिकारी, खासगी कंपन्यांचे अधिकारी अशा विविध वरिष्ठ अधिकारी धावपटूंनी देखील या मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदविला. तसेच पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील विविध शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थी आणि शिक्षकांनीही मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदविला.
९ हजार स्पर्धकांचा सहभाग
या मॅरेथॉनमध्ये सुमारे ९ हजार स्पर्धक सहभागी झाले. यामध्ये ३ आणि ५ कि.मी.च्या धावण्याच्या प्रकारांना सर्वाधिक प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे २१ कि.मी. अर्ध मॅरेथॉनमध्ये ९ अंध धावपटूंनी सहभाग घेत आपल्या जिद्दीचे दर्शन घडविले.
सुप्रसिद्ध अभिनेता अंकुश चौधरींची उपस्थिती...
खारघर हिल महापौर मॅरेथॉनला सुप्रसिद्ध अभिनेता अंकुश चौधरी यांनी विशेष उपस्थिती लावली.मॅरेथॉनच्या सुरूवातीला झेंडा दाखवून त्यांनी स्पर्धकांना प्रोत्साहन दिले.
वैद्यकीय सुविधा.....
या मॅरेथॉनसाठी महापालिकेने मोठ्या प्रमाणात डाॅक्टर्स, फिजिओथेरपिस्ट व ॲम्ब्युलन्स ची सोय केली होती.
मॅरेथॉनचे मार्ग
३ कि.मी. : सेंट्रल पार्क – ग्रामविकास भवन – विश्वज्योत प्रीस्कूल – यू-टर्न – ग्रामविकास भवन – सेंट्रल पार्क.
५ कि.मी. : सेंट्रल पार्क – ग्रामविकास भवन – मुर्बी मेट्रो स्थानक – यू-टर्न – ग्रामविकास भवन – सेंट्रल पार्क.
१० कि.मी. : सेंट्रल पार्क – ग्रामविकास भवन – उत्सव चौक – बेलपाडा मेट्रो स्थानक – आरबीआय कॉलनी मेट्रो स्थानक – यू-टर्न – बेलपाडा मेट्रो स्थानक – उत्सव चौक – ग्रामविकास भवन – सेंट्रल पार्क.
२१ कि.मी. : सेंट्रल पार्क – आरबीआय कॉलनी मेट्रो स्थानक – चाफेवाडी मेट्रो स्थानक – उत्सव चौक – ग्रामविकास भवन – उत्सव चौक – बेलपाडा मेट्रो स्थानक – फणसवाडी – यू-टर्न – आरबीआय कॉलनी मेट्रो स्थानक – बेलपाडा – सेंट्रल पार्क.
४२ कि.मी. : सेंट्रल पार्क – ग्रामविकास भवन – मुर्बी जंक्शन – यू-टर्न – ग्रामविकास भवन – उत्सव चौक – बेलपाडा मेट्रो स्थानक – आरबीआय कॉलनी मेट्रो स्थानक – चाफेवाडी – फणसवाडी – यू-टर्न – आरबीआय कॉलनी मेट्रो स्थानक – बेलपाडा मेट्रो स्थानक – उत्सव चौक – गोल्फ कोर्स रोड – यू-टर्न – ग्रामविकास भवन – गुरुद्वारा – रांजणपाडा – खारघर फुटबॉल स्टेडियम – तळोजा जेल रोड – टाटा मेमोरियल सेंटर – यू-टर्न – तळोजा जेल रोड – खारघर फुटबॉल स्टेडियम – रांजणपाडा – मुर्बी जंक्शन – विबग्योर शाळा – यू-टर्न – मुर्बी जंक्शन – रांजणपाडा – गुरुद्वारा – सेंट्रल पार्क.
Post a Comment