जिल्हा परिषद डेरवली शाळेचा आनंददायी शनिवार : आर्मी शाळेतील विद्यार्थ्यांना रक्षाबंधनातून बंधुभाव देशप्रेम, वृक्षाबंधनातून निसर्गप्रेमाचा संदेश
पनवेल - आनंददायी शनिवार या शैक्षणिक उपक्रमांतर्गत पनवेल तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद डेरवली शाळेच्या विद्यार्थ्यांनी रक्षाबंधन व वृक्षाबंधन हा उपक्रम साजरा केला.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये नमूद केल्यानुसार २१ व्या शतकातील कौशल्ये, व्यवहारिक कौशल्ये व चांगल्या सवयींचे संपादन करून सुजाण व उत्पादक नागरिक घडविण्यासाठी शालेय शिक्षणात आनंददायी शनिवार’.. या उपक्रमाची आखणी करण्यात आली आहे. याच उद्देशाने आयोजित आनंददायी शनिवारच्या उपक्रमांतर्गत पनवेल तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा डेरवली येथील विद्यार्थ्यांनी रक्षाबंधन व वृक्षाबंधन हा उपक्रम उत्साहात साजरा केला.
यावेळी विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या राख्या पनवेल तालुक्यातील विजय आर्मी स्कूल, चिखले येथील विद्यार्थ्यांन बांधून रक्षाबंधनाचा आनंद साजरा केला. या भेटीदरम्यान दोन्ही शाळांतील विद्यार्थ्यांनी एकमेकांशी सुसंवाद साधत मैत्री, बंधुभाव व राष्ट्रीय एकतेचा संदेश दिला. विद्यार्थ्यांच्या या भेटीतून देशप्रेमाची भावना जागृत होण्यास मदत झाली.
तसेच विद्यार्थ्यांनी वृक्षबंधन व वृक्षवंदन करून वृक्षांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. वृक्षसंवर्धनाचे महत्त्व समजून घेत निसर्गप्रेम, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
राखीच्या धाग्यांनी जोडलेली मने, सुसंवादातून दृढ झालेले मैत्रीचे बंध आणि वृक्षबंधनातून जपलेले निसर्गाशी नातेअशा विविध मूल्यांची जोपासना करणारा हा आनंददायी शनिवार विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरला.
Post a Comment