News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

पनवेल महानगरपालिकेचा पहिलाच ‘श्रावण महोत्सव २०२६’ महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न ...विविध घटकांतील महिलांचा सहभाग,स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना मिळाले व्यासपीठ

पनवेल महानगरपालिकेचा पहिलाच ‘श्रावण महोत्सव २०२६’ महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न ...विविध घटकांतील महिलांचा सहभाग,स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना मिळाले व्यासपीठ

पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने आयोजित करण्यात आलेला ‘श्रावण महोत्सव २०२६’ आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह,पनवेल येथे महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाला.पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रथमच अशा स्वरूपाचा श्रावण महोत्सव आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.सर्व स्तरांतील महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा महोत्सव संस्मरणीय ठरला.

सुरुवातीस महापौर नितीन पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी उपमहापौर प्रमिला पाटील, सभागृह नेते प्रकाश बिनेदार,अतिरिक्त आयुक्त मेघमाळे, प्रभाग समिती ‘ड’चे अध्यक्ष अजय बहिरा, प्रभाग समिती ‘अ’चे अध्यक्ष मधु पाटील, तसेच पनवेल महानगरपालिकेचे सन्माननीय नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी व अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
समाजातील प्रत्येक घटकातील महिलांचा अनोखा फॅशन शो .....
महिला सक्षमीकरणाचा संदेश देणारा अनोखा फॅशन शो महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरला. अबोली संघटनेच्या महिला रिक्षाचालक, एकल महिला, स्वच्छता दूत कर्मचारी, आशा सेविका, दिव्यांग महिला, विशेष मुले, तृतीयपंथी, ज्येष्ठ नागरिक महिला आणि लहान मुलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. त्यांच्यासोबत महानगरपालिकेच्या नगरसेविकांनीही हॅण्डलूमच्या साड्या परिधान करून फॅशन शोमध्ये सहभाग घेतला.

स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ...
स्थानिक कलाकार आणि महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आदिवासी नृत्य, मंगळागौर, कोळी नृत्य, लावणी यांसह विविध कार्यक्रमांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशेष मुलांनी सादर केलेला परफॉर्मन्स आणि गणेश वंदना हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. या सादरीकरणांना उपस्थित महिलांनी भरभरून दाद दिली.

महिलांना ‘SHe-Box’ पोर्टलची माहिती..
महिला सुरक्षेच्या दृष्टीने केंद्र सरकारच्या SHe-Box या ऑनलाइन पोर्टलची माहितीही कार्यक्रमात महिलांना देण्यात आली. कार्यस्थळी लैंगिक छळ किंवा संबंधित स्वरूपाची समस्या उद्भवल्यास महिला या पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाइन तक्रार नोंदवू शकतात. संबंधित यंत्रणेमार्फत तक्रारीवर कार्यवाही व तक्रार निवारणाची प्रक्रिया कशी केली जाते, याबाबत उपस्थित महिलांना माहिती देण्यात आली.


समाजातील प्रत्येक स्तरातील महिलांसोबत निवडून आलेल्या महिला लोकप्रतिनिधी खांद्याला खांदा लावून काम करू शकतात आणि त्यांच्या प्रश्नांचे प्रतिनिधित्व सक्षमपणे करू शकतात, हा महिला सक्षमीकरणाचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. 

सत्ताधारी-विरोधक महिला नगरसेविकांचा एकत्रित संदेश..
महिला व बालकल्याण समितीच्या सर्व सदस्यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला. महिला सक्षमीकरण, महिलांची सुरक्षा, रोजगार, आरोग्य आणि विविध सामाजिक प्रश्नांसाठी सर्व महिला नगरसेविका एकत्रितपणे काम करण्यास सक्षम असल्याचा सकारात्मक संदेश यानिमित्ताने पनवेलकरांना देण्यात आला.

पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या ‘श्रावण महोत्सव २०२६’ मध्ये मनोरंजनासोबत महिला सुरक्षा, सामाजिक समावेशकता, विशेष मुलांना प्रोत्साहन, महिला सक्षमीकरण आणि स्थानिक कलागुणांना व्यासपीठ अशा विविध विषयांची सांगड घालण्यात आली. 


“महिलांच्या प्रत्येक प्रश्नावर आणि महिला सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमध्ये महिला व बालकल्याण समितीच्या सर्व सदस्यांचा मला नेहमीच सकारात्मक प्रतिसाद मिळतो. त्याच सहकार्यामुळे हा श्रावण महोत्सव इतक्या मोठ्या स्वरूपात यशस्वी झाला. महिलांचे प्रश्न आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी  प्रत्येक स्तरातील महिलेसोबत आम्ही सर्व महिला नगरसेविका सक्षमपणे उभ्या आहोत, हाच संदेश या महोत्सवातून आम्हाला द्यायचा होता.”

— ममता प्रीतम म्हात्रे, 
सभापती, 
महिला व बालकल्याण समिती, 
पनवेल महानगरपालिका


ज्येष्ठ महिला नगरसेविकांच्या हस्ते नवोदित कलाकारांचा गौरव.....
या महोत्सवाला पनवेल नगर परिषदेच्या काळात काम केलेल्या माजी ज्येष्ठ महिला नगरसेविका विशेषत्वाने उपस्थित होत्या. कार्यक्रमातील नवोदित कलाकारांना त्यांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. विद्यमान अनेक नगरसेविका कार्यक्रमस्थळी उपस्थित असतानाही ज्येष्ठ महिला लोकप्रतिनिधींना हा सन्मान देण्याचा निर्णय घेण्यात आला.

पनवेलच्या विकासाची मुळे रुजविण्यात जुन्या-जाणत्या महिला नगरसेविकांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यांनी रुजविलेल्या विकासाच्या मुळांचे आज मोठ्या वृक्षात रूपांतर करण्याची जबाबदारी नव्याने निवडून आलेल्या महिला लोकप्रतिनिधींवर आहे. ज्येष्ठांच्या अनुभवाचा सन्मान करत सत्ताधारी आणि विरोधक अशा सर्व महिला नगरसेविका एकत्र येऊन सक्षम पनवेल घडविण्यासाठी कार्यरत राहतील, असा संदेश या कृतीतून देण्यात आला.


विशेष मुलांनी बनवलेल्या राख्यांना प्रोत्साहन ....
महोत्सवाच्या ठिकाणी बौद्धिक दिव्यांग मुलांनी स्वतःच्या हाताने तयार केलेल्या राख्यांचे विक्री केंद्र उभारण्यात आले होते. या मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन आणि त्यांच्या स्वावलंबनाला हातभार लावण्यासाठी उपस्थित प्रत्येक महिलेने या केंद्रातून किमान दोन राख्या खरेदी कराव्यात, असे आवाहन महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ.ममता प्रीतम म्हात्रे यांनी केले.आपल्या छोट्याशा योगदानातून या विशेष मुलांच्या प्रयत्नांना बळ मिळू शकते, असा संदेश त्यांनी यावेळी दिला.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment