पनवेल महानगरपालिकेतर्फे महिलांसाठी ‘श्रावण महोत्सव २०२६’....महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ.ममता प्रितम म्हात्रे यांच्या विशेष पुढाकारातून या महोत्सवाचे नियोजन
पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने ‘श्रावण महोत्सव २०२६’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन मंगळवार, दि.१८ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २ वाजता आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह,पनवेल येथे करण्यात आले आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सर्व महिला भगिनींसाठी हा कार्यक्रम असून प्रवेश विनामूल्य असून महापालिका क्षेत्रातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
श्रावण महिन्यातील पारंपरिक सणवारांना, संस्कृतीला कला मनोरंजनाची जोड देत महिलांच्या उत्साहाला व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.महिलांसाठी एक दिवस आनंदाचा,उत्साहाचा आणि सक्षमीकरणाचा!’ ही या महोत्सवामागील संकल्पना आहे.
महोत्सवात प्रसिद्ध अभिनेता दिगंबर नाईक,अभिनेत्री सायली पराडकर तसेच लावणी सम्राट आश्मिक कामठे यांची विशेष उपस्थिती व सादरीकरण आकर्षण ठरणार आहे.यासोबतच पारंपरिक मंगळागौर,लावणीसह विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच महिलांसाठी आकर्षक लकी ड्रॉ व बक्षिसांची मेजवानी असणार आहे.
कार्यक्रमास पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर व विधानपरिषद सदस्य आमदार विक्रांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन जयराम पाटील असणार आहेततसेच महानगरपालिकेतील विविध पदाधिकारी व अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ.ममता प्रितम म्हात्रे यांच्या विशेष पुढाकारातून या महोत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सर्व महिला भगिनींनी या आनंदोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
“श्रावण महोत्सवाच्या माध्यमातून महिला भगिनींना मनोरंजन, पारंपरिक संस्कृती, कला आणि आनंदाने भरलेला एक हक्काचा दिवस अनुभवता यावा, हा या आयोजनाचा मुख्य उद्देश आहे.यासोबतच महिलांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित विविध विषयांची उपयुक्त माहितीही सहज-सोप्या पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या महोत्सवातून करण्यात येणार आहे.”
ममता प्रितम म्हात्रे
सभापती,
महिला व बालकल्याण समिती,
पनवेल महानगरपालिका
Post a Comment