पनवेल महानगरपालिका महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने विविध विषयांवर आढावा बैठक....महिला व बालकांच्या कल्याणासाठी नवीन उपक्रमांवरमहिला व बालकल्याण समितीच्या सभापती ममता प्रितम म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत चर्चा
पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी, योजनांमध्ये आवश्यक सुधारणा तसेच नवीन योजनांचे प्रस्ताव याबाबत मुख्यालयात बैठक घेण्यात आली. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती ममता प्रितम म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या बैठकीत महिला व बालकांच्या शैक्षणिक, आर्थिक सक्षमीकरण आणि सामाजिक कल्याणाशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी महिला बालकल्याण समितीच्या सर्व सदस्या, अतिरीक्त आयुक्त महेशकुमार मेघमाळे, उपायुक्त मंगला माळवे, सहाय्यक आयुक्त डॉ. रूपाली माने, महिला व बालकांच्या कल्याण विभागप्रमुख कविता मोकल, डेएनयुएलएम व्यवस्थापक विनया म्हात्रे उपस्थित होत्या.
याबैठकीत महिला आरोग्य व मातृ-शिशु आरोग्य संवर्धन योजना, हिरकणी कक्ष उभारणी, तसेच कॅन्सरग्रस्त रूग्णांसाठी आर्थिक सहाय्याची वार्षिक रक्कम वाढविण्याबाबत चर्चा करण्यात आली. मातृ-शिशु आरोग्य योजनेअंतर्गत गरजेनुसार मातांना व नवजात बालकांना सर्वसमावेशक व विनामूल्य आरोग्य सेवा प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याबाबतही विचारविनिमय करण्यात आला.
तसेच, अनाथ बाल शिक्षण शिष्यवृत्ती योजना, अनाथ बाल शिक्षण प्रवेश सहाय्य योजना, एकल स्त्री पाल्य शिक्षण शिष्यवृत्ती योजना, एकल स्त्री पाल्य शिक्षण प्रवेश सहाय्य योजना आणि एकल स्त्री स्वावलंबन सन्मान योजना यांचा आढावा घेण्यात आला. या योजनांचा अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील महिला बचत गट व महिला उद्योजिकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘मोदक व पुरणपोळी महोत्सव – २०२६’ आयोजित करण्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच श्रावण महिन्यानिमित्त 'श्रावण महोत्सव 2026' सांस्कृतिक कार्यक्रम 18 ऑगस्ट 2026 आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.
महिला व बालकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ पात्र महिला, बालके आणि गरजू कुटुंबांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी विभागीय पातळीवर आवश्यक कार्यवाही करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.
महिला व बालकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या प्रभावी अमंलबजावणीबाबत अतिरिक्त आयुक्त महेशकुमार मेघमाळे यांनी बैठकीस मार्गदर्शन केले.
Post a Comment