शेडुंग येथील सेंट विल्फ्रेड महाविद्यालयातील उपप्राचार्यांकडून लाचेची मागणी व विद्यार्थिनीशी गैरवर्तन? ... तातडीने कारवाई करा,अन्यथा युवासेनेच्यावतीने तीव्र आंदोलनाचा इशारा .... युवासेना आणि कर्जत-खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांचे पोलिस प्रशासनाला पत्र
पनवेल - पनवेलजवळील शेडुंग येथील सेंट विल्फ्रेड महाविद्यालयातील उपप्राचार्यांकडून लाचेची मागणी व विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याच्या गंभीर प्रकरणामुळे संपूर्ण नवी मुंबई परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.शिक्षण क्षेत्रातील या धक्कादायक घटनेचा युवासेनेच्यावतीने तीव्र निषेध नोंदविण्यात आला आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे व खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली, युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवासेना कार्यकारणी सदस्य श्री.विकास गोगावले यांच्या सूचनेनुसार युवासेनेच्यावतीने श्री.प्रशांत मोहिते, पोलीस उपायुक्त,नवी मुंबई यांना निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनाद्वारे प्रकरणाची तात्काळ, निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच पीडित विद्यार्थिनीला तात्काळ पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी ठोस मागणी करण्यात आली आहे.
सदर प्रकरणात संबंधित उपप्राचार्याने ATKT विषयांमध्ये उत्तीर्ण करून देण्यासाठी प्रति विषय रुपये ६,०००/- लाचेची मागणी केल्याचा गंभीर आरोप आहे. तसेच विद्यार्थिनीला एकांतस्थळी नेण्याचा प्रयत्न करत अयोग्य वर्तन केल्याची बाबही समोर आली आहे. पीडित विद्यार्थिनीने या घटनेचे व्हिडिओ रेकॉर्डिंगद्वारे पुरावे सादर केले असतानाही महाविद्यालय प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप असून ही बाब अत्यंत संतापजनक असल्याचे युवासेनेने नमूद केले आहे.
कर्जत-खालापूरचे आमदार श्री.महेंद्र थोरवे यांनी या संदर्भात पोलिस प्रशासनाला स्वतंत्र पत्र देत म्हटले आहे की, “शेडुंग येथील सेंट विल्फ्रेड महाविद्यालयातील प्रकार हा विद्यार्थिनींच्या सन्मानावर थेट आघात करणारा असून अत्यंत संतापजनक आहे.दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करून पीडितेला पोलीस संरक्षण देण्यात यावे तसेच प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी.”
युवासेना लोकसभा अध्यक्ष श्री.पराग मोहिते यांनी या घटनेचा निषेध नोंदवत स्पष्ट इशारा दिला की, “ही लढाई केवळ एका विद्यार्थिनीसाठी नाही, तर प्रत्येक मुलीच्या सन्मानासाठी आहे.दोषींना कठोर शिक्षा होईपर्यंत युवासेना शांत बसणार नाही.”
युवासेनेच्या वतीने पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत:
१) प्रकरणाची तात्काळ,निष्पक्ष व सखोल चौकशी करावी.
२) आरोपीवर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे कठोर कलमे लावून कारवाई करावी.
३) महाविद्यालय प्रशासनाच्या निष्काळजीपणाची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी.
४) पीडित विद्यार्थिनीला तात्काळ पोलीस संरक्षण व न्याय द्यावा.
५) नवी मुंबईतील सर्व महाविद्यालयांमध्ये “विशेष महिला पोलीस सहकार्य सेल” स्थापन करावा.
६) भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी कडक मार्गदर्शक तत्त्वे व नियमित तपासणी राबवावी.
यावेळी जिल्हा अध्यक्ष श्री.प्रीतम सुर्वे,जिल्हा अध्यक्ष श्री. प्रसाद थोरवे,जिल्हा अध्यक्ष श्री.रोशन पुजारी, जिल्हा सचिव श्री.रोहन ढोले,महानगर अध्यक्ष श्री.प्रेम ठाकूर,तालुका सचिव श्री.निखिल ठाकूर, तसेच प्रणव लबडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर प्रकरणात तातडीने व ठोस कारवाई करावी,अन्यथा युवासेनेच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
Post a Comment