डॉ.नंदकुमार मारुती जाधव यांना ‘महात्मा ज्योतिबा फुले नॅशनल सन्मानपदक’ जाहीर...... राजधानी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय सोहळ्यात होणार गौरव
पनवेल - बाबू जगजीवन राम कला,संस्कृती तथा साहित्य अकादमीच्यावतीने दिला जाणारा देशातील प्रतिष्ठित ‘महात्मा ज्योतिबा फुले नॅशनल सन्मानपदक’ यंदा डॉ. नंदकुमार मारुती जाधव यांना प्रदान करण्यात येणार आहे. राजधानी दिल्ली येथे लवकरच होणाऱ्या राष्ट्रीय सोहळ्यात हा गौरव समारंभ पार पडणार आहे.
डॉ. जाधव यांनी गेली अनेक वर्षे शैक्षणिक,सामाजिक आणि विशेषतः बौद्धिक अक्षम मुलांच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत डॉ.नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक अक्षम मुलांची विशेष शाळा अनेक मुलांचे आयुष्य घडविण्यासाठी सातत्याने काम करत आहे. शिक्षणासोबतच क्रीडा,सांस्कृतिक उपक्रम, स्वावलंबन प्रशिक्षण आणि समाजामध्ये जागृती निर्माण करण्यावर त्यांनी विशेष भर दिला आहे.
या उल्लेखनीय योगदानाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेऊन अकादमीने त्यांना हा मानाचा सन्मान जाहीर केला आहे. विशेष मुलांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी केलेल्या कार्यामुळे समाजात सकारात्मक बदल घडत असल्याचे अकादमीने नमूद केले आहे.
या सन्मानामुळे विशेष शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मोठी प्रेरणा मिळणार असून, डॉ.जाधव यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी विविध क्षेत्रांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Post a Comment