पनवेल तालुक्यातील मोरटाका आदिवासी वाडीतील आदिवासी बांधवांचे पनवेल प्रांत कार्यालया समोरील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित,..... प्रांताधिकारी पवन चांडक यांनी मागितली आठ दिवसांची मुदत..... ठोस कारवाई न केल्यास कोकण आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा उपोषणकर्त्यांचा इशारा
पनवेल - पनवेल तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत कर्नाळा हद्दीतील (कल्हे) मोरटाका आदिवासीवाडी येथील दोन फार्म हाऊस धारकांच्या वादात मागील २३ वर्षांपासून आदिवासींचा रस्ता अडकला आहे.रायगड जिल्हा परिषदेकडून सदर रस्त्याला ग्रामीण मार्ग क्रमांक २९६ चा दर्जा दिला असताना व हा रस्ता व त्यावरील साकव दुरुस्तीसाठी वारंवार शासकीय निधी मंजूर असताना शासकीय यंत्रणा मात्र हा रस्ता व त्यावरील दुरुस्तीच्या कामात कुचकामी ठरल्याचे दिसत आहे. प्रशासकीय इच्छाशक्तीचां अभाव आणि या रस्त्याच्या शेजारी असलेल्या फार्महाऊस धारकांच्या आपसी वादामुळे आदिवासी समाजात दोन गट निर्माण झाले असून या दोन गटांमुळे मागील २३ वर्षापासून येथील आदिवासी व स्थानिक ग्रामस्थांना रस्त्याचा प्रश्न प्रलंबित आहे.
उपोषणकर्ते गणपत लहू पवार व इतर आदिवासीनी ग्रा.मा.२९६ रस्ता व साकव दुरूस्ती तात्काळ करावी या मागणीसाठी मंगळवारपासून उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी पनवेल यांचे कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणास बसले होते.प्रांताधिकारी पवन चांडक यांनी उपोषणकर्त्यांसोबत चर्चा करून सात दिवसात गटविकास अधिकारी पनवेल,अप्पर तहसीलदार पनवेल व इतर संबंधित यंत्रणामार्फत प्रत्यक्ष वस्तुस्थिती लक्षात घेऊन पुढील कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन देत उपोषण मागे घेण्याची विनंती केल्यावरून आदिवासी बांधवांनी सदरचे उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे.मात्र दिलेल्या मुदतीत योग्य ती कारवाई न झाल्यास कोकण आयुक्तांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा यावेळी उपोषणकर्त्यांनी दिला आहे.
Post a Comment