News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

navi mumbai

navi mumbai

उलवे  : "आज जी काही माझी अभिनय क्षेत्रात वाटचाल सुरू आहे ती केवळ रसिकांमुळेच! रसिक प्रेक्षक माझे मायबाप आहेत. माझ्या आयुष्यात निवेदिता आली आणि आयुष्यच उजळून गेले.सर्वांनाच अशा बायका मिळतात असे नाही. मी रसिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचे काम प्रामाणिकपणे केले,मला महाराष्ट्राच्या जनतेने भरभरून प्रेम दिले. या पूर्वी माझे अनेक सत्कार झालेत, पण उलव्यातील नागरी सत्कार मी आयुष्यभर विसरणार नाही.त्यामुळे महेंद्रशेठ घरत यांच्याही प्रेमात मी पडलोय व त्यांच्याबद्दल माझ्यामनात आदर वाढला,"असे 'पद्मश्री' आणि 'महाराष्ट्र भूषण'पुरस्कारप्राप्त अशोक सराफ नागरी सत्काराला उत्तर देताना म्हणाले.

मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते,अभिनयाचे बादशहा अशोक सराफ यांचा हजारो चाहत्यांच्या तुफान गर्दीत उलव्यातील 'भूमिपुत्र भवन' येथे रविवारी सपत्निक भव्य नागरी सत्कार सोहळा झाला. यावेळी नरेंद्र बेडेकर निर्मित 'बहुरूपी अशोक'च्या मेजवानीने रसिक मंत्रमुग्ध झाले होते. हा नागरी सत्कार समारंभ यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेने आयोजित केला होता.या सोहळ्याला माजी मुख्यमंत्री,माजी केंद्रीय गृहमंत्री आणि आंध्र प्रदेशचे माजी राज्यपाल सुशीलकुमार शिंदे,महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक,रायगडचे खासदार सुनील तटकरे,माजी खासदार रामशेठ ठाकूर उपस्थित होते.

अशोक सराफ यांच्यावर प्रेम करणारे चाहत्यांनी तुफान गर्दी केल्याने 'भूमिपुत्र भवन' खचाखच भरले होते.यावेळी अशोक मामांना रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात सलामी दिली.रायगडचे खासदार सुनील तटकरे म्हणाले, "अशोक सराफ यांच्यासारखा कलाकार पुन्हा होणे नाही. त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळायला हवा. आम्हालाही राजकारणात रोज नवनवीन भूमिका कराव्या लागतात. अशा सर्व कलाकार मंडळींना एकत्र आणण्याचे काम महेंद्रशेठ घरत यांनी केले. ही किमया केवळ महेंद्रशेठ हेच करू शकतात."

माजी खासदार रामशेठ ठाकूर म्हणाले, " आम्ही आजही अशोक सराफ यांचे चित्रपट आणि सिरीयल बघत असतो. महेंद्रशेठ माझा शिष्य नाही तर भाऊ आहे असे मी मानतो."
 
माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले, "अशोक सराफ यांनी महाराष्ट्रीयन जनतेला खळखळून हसविले. रायगडसाठी लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे योगदान खूप मोठे आहे. रोखठोक बोलण्याची ते नेहमी तयारी ठेवायचे. ज्यावेळी साडेबारा टक्क्यासाठी गोळीबार झाला त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनाही त्यांनी सोडले नाही. सांस्कृतिक मंत्री असताना चित्रपट सृष्टीसाठी खूप मोठे योगदान मी दिले आहे. महेंद्र घरत गुणवत्ता असूनही राजकारणामध्ये थोडे मागे राहिले त्यांना योग्य स्थान मिळायला हवे."
राज्याचे वनमंत्री गणेश नाईक म्हणाले, "अशोक सराफ यांचे चित्रपटसृष्टीसाठी योगदान खूप मोठे आहे. रसिकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवत ते आजही काम करत आहेत. निवेदिता सराफ यांचे अशोक सराफ यांच्या जीवनामध्ये खूप मोठे योगदान आहे. तसेच महेंद्र घरत यांनी मनामध्ये ठरवले तर ते काहीही करू शकतात. एकाच व्यासपीठावर अनेक पक्षातील नेत्यांना एकत्र आणण्याचे काम तेच करू शकतात."

यावेळी महेंद्रशेठ घरत म्हणाले, "भूमिपुत्र भवनाच्या निर्मितीत माझा सिंहाचा वाटा आहे. उरणचे हुतात्मा स्मारकाची मागणी केली, भूखंड आरक्षित झाला, पण खारफुटीत अडकला. आता तो उभारण्याबाबत मान्यवर मंडळींनी प्रयत्न करावेत."
यावेळी शिवव्याख्याते प्रशांत देशमुख, साई मंदिर वहाळचे संस्थापक रविशेठ पाटील, शिवसेनेचे बबनदादा पाटील, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, मिलिंद पाडगावकर, माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील, विनोद म्हात्रे, गोपाल पाटील,राम हरी म्हात्रे, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते.शेलघर येथील यमुना सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महेंद्रशेठ घरत आणि सचिव सौ. शुभांगीताई घरत यांनी रायगड, नवी मुंबईतील नागरिकांच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन केले होते.

"कलेवर मी प्रेम करतो. नाटक, चित्रपट, क्रिकेट यांची मलाही आवड आहे. कला जिवंत राहावी, तिला चांगले व्यासपीठ मिळावे, म्हणून ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्यासारख्या  दिग्गज अभिनेत्याला उलवे नगरीत आणले. रसिकांच्या तुडुंब गर्दीत आज त्यांना 'याचि देही याचि डोळा' सर्वांनी पाहिल्याने मलाही मनस्वी आनंद झाला. त्यांना मानाचा मुजरा करतो."
- महेंद्रशेठ घरत, आंतरराष्ट्रीय कामगार नेते.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment