कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या परदेश प्रवासाची पंचविशी'चे शनिवारी प्रकाशन! .... लोकनेते रामशेठ ठाकूर आणि शेकापचे जयंत पाटील एकाच व्यासपीठावर
उलवे : आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या परदेश प्रवासाची पंचविशी'चे शनिवारी प्रकाशन होत असून या कार्यक्रमाच्या निमित्ताने लोकनेते रामशेठ ठाकूर आणि शेकापचे जयंत पाटील एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत.आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या परदेशातील प्रवासाला यंदा २५ वर्षे पूर्ण होत आहेत.आजपर्यंत त्यांनी किमान अर्धे जग पालथे घातले आहे आणि सफाई कर्मचारी ते सर्वसामान्य सहकारी अशा किमान ४०० सहकाऱ्यांना त्यांनी परदेश पर्यटन घडविले आहे. त्यांनी कधी पर्यटन, तर कधी आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगारांचे नेतृत्व करताना तेथील बैठकांत आपल्या वक्तृत्व आणि कर्तृत्वाने पाडलेली छाप याची काही मंडळी साक्षीदार आहेत. काही मान्यवरांचे परदेश पर्यटनातील अनुभव,तसेच परदेश पर्यटनाची मुहूर्तमेढ रोवणारे शेकापचे जयंत पाटील आणि माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचे परदेशातील अनुभव वाचकांना निश्चितच भुरळ पाडणारे आहेत. एकंदरितच महेंद्रशेठ घरत यांच्या परदेश प्रवासाची सुरुवात,प्रवासात घडलेल्या गमतीजमती वाचकांना निश्चितच मानसिक समाधान देतील. 'कैलास मानसरोवर' ही अतिशय कठीण आणि पवित्र समजली जाणारी यात्रा महेंद्रशेठ घरत यांनी सपत्निक पूर्ण केली.त्याचे यथासांग वर्णन 'परदेश प्रवासाची पंचविशी' या मिनी काॅफिटेबल बुकमध्ये आहे.
त्याचे प्रकाशन शनिवारी,२ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता होणार आहे.माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि शेकापचे नेते जयंत पाटील हे प्रकाशन सोहळ्यानिमित्त एकाच व्यासपीठावर येणार आहेत.प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि 'बित्तंबातमी' या दैनिकाचे संपादक-मालक संदीप चव्हाण उपस्थित राहणार आहेत. हा सोहळा उलवे नोड येथील शेलघर येथे सिद्धिविनायक बॅंक्वेट हाॅलमध्ये होणार आहे.अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत होणारा हा सोहळा रसिकांसाठी एक मेजवानी ठरेल.त्यामुळे या प्रकाशन सोहळ्याला सर्वांनी उपस्थित राहावे,असे आवाहन आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी केले आहे.
Post a Comment